देवेंद्र फडणवीसांच्या आणीबाणीच्या लेखावर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आज निवडणूक आयोग…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीबाबत लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. खडसे यांनी फडणवीसांना त्यांच्याच घरातील शीश्याकडे लक्ष वेधून टोला लगावला आहे. त्यांनी आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव आणि आजच्या राजकीय परिस्थितीतील प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या आणीबाणीच्या लेखावर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आज निवडणूक आयोग...
Devendra Fadnavis-Sharad Pawar
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 25, 2025 | 11:54 AM

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाला आज ५० वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमानपत्रांमध्ये आणीबाणीच्या पन्नाशीवर लेख लिहिला आहे. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्षं झाली, एवढेच म्हणावे लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टोला लगावला आहे.

रोहिणी खडसेंचा फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तमानपत्रांमध्ये आणीबाणीच्या पन्नाशीवर लेख लिहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावरून जिनके खुदके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, “आज २५ जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे ?” असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या मंडळींना आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार?

“आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे ? माध्यमं स्वतंत्र आहेत ? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना ? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार?” असा जाब रोहिणी खडसेंनी विचारला. “आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाणे भरून काढले आहेत. पण चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते”, असा टोला रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.