
राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पाऊस, थंडी आणि उकाडा असे तिन्ही हंगाम बघायला मिळत आहेत. वातावरणातील बदलाचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनाशी संबंधित आजारही जाणवत आहेत. त्यामध्येच अनेक शहरांमध्ये सध्या वायू प्रदूषण हा मोठा मुद्दा बनलाय. मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये अनेक उपायोजना करूनही वायू प्रदूषण काही कमी होत नाही. परिणामी लोकांना मास्क घालून फिरावे लागत आहे. दुसरीकडे उत्तरेकडे प्रचंड थंडी असून पारा घसरताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात वातावरणात चढउतार बघायला मिळेल. राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी होती. मात्र, त्या तुलनेत जानेवारी महिन्यात थंडी नाहीये. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे तर पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे शहरात गारठा वाढला असून तो पुढील दोन दिवस कायम राहणारा असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वीच किमान तापमानात वाढ झाली होती. आता पुन्हा थंडी परतल्याचे चित्र आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमध्ये मोठी वाढ होईल. काही भागात गारठा कमी होण्याचाही अंदाज आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. निफाडमध्ये 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोदिंया येथे 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर धुळ्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील गारठा सतत कमी जास्त होताना दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दुपारच्यावेळी उकाडा जाणू शकतो. राज्यासह देशातही परिस्थिती सारखीच आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी परिस्थिती अनेक भागात सध्या बघायला मिळत आहे. यादरम्यान नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मुंबई शहर व उपनगराताल हवेच्या गिनवत्तेत सुधारणा झाली असून समीर ऍपच्या नोंदणीनुसार रविवारपासून शहराच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक श्रेणीत नोंदला जात आहे. मंगळवारीदेखील शहरातील हवेने समाधानकारक श्रेणीचीच नोंद केली. यामुळे सध्या तरी मुंबईकरांना प्रदूषित हवेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या हवेत पुन्हा प्रदूषित हवेचा टक्का वाढला.