
अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ ‘शक्ती’चा मोठा प्रभाव पडले आणि मुसळधार पाऊस पडेल, असे अगोदर सांगण्यात आले. मात्र, नुकताच भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले की, या शक्ती चक्रीवादळाचा फार काही परिणाम होणार नाही. हवामान विभागाने नुकतीच ही माहिती दिलीये. सोमवारपासून म्हणजेच 6 आॅक्टोबरपासून हे वादळ कमकुवत होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत फक्त हलक्या सरींचा अधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिली शक्ती चक्रीवादळाबद्दल मोठी माहिती
IMD ने मुंबईसाठी दिलेल्या आधीच्या इशाऱ्यांमध्ये आता बदल केलाय, त्यामुळे पुढील काही दिवसांत केवळ हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. शनिवारपासून 100 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अरबी समुद्रात खळबळ उडवणारे चक्रीवादळ ‘शक्ती’ आता हळूहळू कमकुवत होण्याच्या मार्गावर आहे. हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, हे चक्रीवादळ रविवारी संध्याकाळपर्यंत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्रापर्यंत पोहोचल्यावर पूर्वेकडे वळण्यास सुरुवात करेल.
मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाचा मोठा इशारा
चक्रीवादळाच्या थेट परिणामातून मुंबईची सुटका झाली असली, तरी राज्याच्या अन्य भागात विशेषतः मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणातील काही भागांमध्येही सखल भागात स्थानिक पातळीवर पाणी साचण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, IMD ने मच्छीमारांना इशारा दिला आहे की, मंगळवारपर्यंत उत्तर-पश्चिम आणि मध्य अरबी समुद्रात तसेच गुजरातमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारीसाठी जाणं टाळावं कारण समुद्र अजूनही खवळलेला आहे.
हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यामध्ये नेमकं काय?
चक्रीवादळाचा मुंबईमध्ये थेट परिणाम होणार असल्याचे अगोदर सांगितले गेले. मात्र, आताच्या नव्या इशाऱ्यानुसार कोणताही परिणाम मुंबईवर होणार नाही. राज्यात काही दिवसांपूर्वी पावसाने मोठा धुमाकून घातला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता परत एकदा मराठवाड्यातील काही भागांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसण्याचे मोठे संकेत आहेत. काही भागात पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.