
राज्यातील वातावरणात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरांमध्ये थंडीचा कडाका वाढला होता. आता परत थंडी गायब झाली. डिसेंबर महिना संपूर्ण राज्यात थंडी होती. मात्र, 1 जानेवारी रोजी अवकाळी पाऊस झाला आणि राज्यातून थंडी गायब झाली. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, थंडी जानेवारी महिन्यात देखील राहण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात पारा वाढताना दिसत आहे. उत्तरेकडे सध्या प्रचंड थंडी आहे. राज्यात म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात शीतलहरी येत नसल्याने गारठा कमी झाला. दुपारच्यावेळी चांगलाच उकाडा जाणवत आहे. देशाच्या काही भागात प्रचंड थंडी आहे तर काही भागात उकाडा जाणवत आहे. केरळ, तामिळनाडू भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.
मॉन्सून जाऊन काही महिने झाली असताना अजूनही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा अंदाज दिला असून आज राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
नंदूरबार, जळगाव, नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर या भागात पावसाची हजेरी लागू शकते. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली. धुळ्यात 10.2 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे 10.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. ब्रह्यपुरी येथे 33.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्याच्या परिस्थितीली राज्यातून गारठा गायब झाला आहे.
राज्यातील किमान तापमानात वाढ कायम आहे. आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस काही भागात धुमाकूळ घालू शकतो. सतत हवामान बदलत असल्याने त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय वाढलेल्या वायू प्रदूषणाने आरोग्याच्या असंख्य समस्या या निर्माण होत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढताना दिसत आहे. पालिकेकडून दावा केला जात आहे की, आमच्याकडून प्रयत्न रोखण्याचे प्रयत्न सुरू असून कारवाई केली जात आहे.