
राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज देशमुख निवृत्ती महाराज देशमुख हे मुलीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच त्यांची मुलगी ज्ञानेश्वरीचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. इंदुरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात अनेकदा लग्नात कर्ज काढून खर्च करू नका असा संदेश दिला आहे, मात्र मुलीच्या साखरपुड्यात खर्च केल्यामुळे संपूर्ण राज्यात त्यांची चर्चा आहे. आज आपण इंदुरीकर महाराजांचे शिक्षण किती आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
इंदुरीकर महाराज हे आपल्या किर्तनात नेहमीच शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत असतात. अभ्यास करून मोठे अधिकारी व्हा आणि समाजाची सेवा करा असं त्यांना अनेकदा म्हटलं आहे. तसेच जी मुले अभ्यासात हुशार नाहीत त्यांनी मोक्कार शिक्षण बंद करा आणि व्यवसायाकडे वळा असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. तसेच तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, विद्यार्थ्यांनी शाळेत असताना कॉपी करू नये, कॉपी करताना आढळल्यास संबंधित मुलाच्या पालकांनी त्याला बदडून काढले पाहिजे असं महाराजांनी म्हटले आहे.
आपल्या किर्तनामुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी माध्यमिक शिक्षणानंतर बीएस्सीची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून बी.एड. ही पदवी प्राप्त केली . त्यानंतर त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले आणि वयाच्या 22 व्या वर्षी कीर्तन करण्यास सुरुवात केली. आपल्या किर्तनाच्या अनोख्या शैलीमुळे ते अल्पावधीत प्रसिद्ध झाले. सध्या ते संपूर्ण राज्यात किर्तन आणि समाजप्रबोधन करतात.
इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहे. मुलगी ज्ञानेश्वरीचा अलिकडेच साखरपुडा झाला आहे. महाराजांचा होणारा जावई हा बांधकाम व्यावसायिक आहे. महाराजांचा मुलगा कृष्णा हा वारकरी पंथाचे शिक्षण घेत आहे, तसेच तो भजन देखील गातो. इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई यादेखील महिला किर्तनकार आहेत. हे संपूर्ण कुटुंब वारकरी पंथाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहे.