
Indurikar Maharaj : आजकाल लग्न हा दोन जीवांचं, दोन कुटंबाचं मिलन नव्हे तर अगदी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात करतात आणि कर्जबाजारी होतात असं म्हणत प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज हे थाटात लग्न न करण्याचा सल्ला देत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्याच लेकीच मोठ्या थाटात, शाही अंदाजात साखरपुडा झाला. या साखरपुड्याची काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आणि बरीच चर्चा झाली. लोकांना साधेपणाचा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या लग्नात बराच खर्च केल्याचे दिसून आल्यावर लोकांनी आता त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं आहे.
त्यांच्या लेकीने साखरपुड्यात मोठी थाटात एंट्री केली, तिचे कपडे, दागिने यांचे फोटो पुढे आले असून त्यातील भपकेबाजीमुळे लोकांनी इंदुरीकर महाराज यांनाच प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. लग्न आणि त्यावर होणारा खर्च यावर इंदुरीकर महाराजांनी बऱ्याचा टीका केली आहे, मात्र स्वत:च्या लेकीच्या लग्नात ते सगळं विसरले आणि सध्याच्या ट्रेंडनुसार शोबाजी करत साखरपुडा केला असं लोकांनी म्हटलं. लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण, गाड्यांचा ताफा, थाटमाट यावरून लोकांनी त्यांना सुनावलं. मात्र आता या सर्व टीकेला इंदुरीकर महाराज यांनी थेट उत्तर दिलं असून त्यावर भाष्य करत टीकाकारांना सुनावलं
इंदुरीकर महाराज यांचं टीकाकारांना थेट चॅलेंज
नुकतंच त्यांचं कीर्तन पार पडलं, त्यावेळी त्यांनी टीकाकारांना खडेबोल सुनावले. माझ्यापर्यंत ठीक होतं, पण आता लोकं माझ्या मुलीलाही बोल लावत आहेत. तिच्या कपड्यांबद्दल कमेंट केली जात आहे, लोकांनी किती खालची पातळी गाठली आहे असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मात्र त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी टीकाकारांना, ट्रोल करणाऱ्यांना थेट चॅलेंज दिलं आहे. ‘मला माहीत होतं या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. त्यांना चॅलेंज सांगतो मी (मुलीचं) लग्न याच्यापेक्षाा टोलेजंग करणार आहे, बघू कोणाचं काय म्हणणं आहे ते ‘ असा थेट इशारा इंदुरीकर महाराज यांनी दिला. ‘ 30 मिनिटांच्या सभेला 3 कोटी खर्च आहे, कोणत्याही चॅनेलवाल्यांना विचारून दाखवा, पैसे कुठून आणले ?’ असंही ते म्हणाले. ही सगळी विकली गेलेली लोकं आहेत, दुसऱ्याला किती त्रास द्याव यालाही मर्यादा आहेत हो, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत इंदुरीकर महाराज यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.