Bullet Train | भुकंप येण्यापूर्वी आपोआप थांबणार ट्रेन, या तंत्राचा देशात होणार प्रथमच वापर

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गुजरात राज्यात वेगाने सुरु आहे. या बुलेट ट्रेनचा प्रवास निर्धाेक करण्यासाठी तिला कोणत्याही स्वरुपाच्या भूकंपापासून वाचविण्यासाठी जपानचे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Bullet Train | भुकंप येण्यापूर्वी आपोआप थांबणार ट्रेन, या तंत्राचा देशात होणार प्रथमच वापर
Mumbai-Ahmedabad High-Speed Rail Corridor
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 29, 2024 | 9:24 PM

मुंबई | 29 जानेवारी 2024 : मुंबई ते अहमदाबाद या 508 किमीच्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन मार्गाचे बांधकाम सुरु आहे. या मार्गासाठी हवे असलेल्या जमीनीचे शंभर टक्के संपादन नुकतेच पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेनचा संपूर्ण मार्ग हा एलिवेटेड ( उन्नत ) असून या बुलेट ट्रेनला भूकंपापासून सुरक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी बुलेट ट्रेनच्या मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकूण 28 भूकंपमापक यंत्रे ( सेस्मोमीटर ) बसविण्यात येणार आहेत. त्यातील 22 भूकंपमापक यंत्रे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाशेजारील भागात उभारण्यात येणार आहेत. या पैकी आठ भूकंपमापक यंत्रे महाराष्ट्रात तर 14 भूकंपमापक यंत्रे गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद बुलेट मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. या मार्गासाठीचे शंभर टक्के जमीन संपादन कार्य पूर्ण झाले आहे. या बुलेट ट्रेन मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भूकंपमापक यंत्रे बसविण्याचे काम सुरु होणार आहे. भूकंपाचा हादरा जाणविताच हे भूकंपमापक यंत्रे भूकंपाची तीव्रता मोजून तातडीने वीज उपकेंद्रांना संदेश धाडतील आणि त्यानंतर वीजप्रवाह तातडीने बंद करण्यात येऊन बुलेट ट्रेन जागीच थांबविण्यात येतील अशी व्यवस्था निर्माण होणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून ते जपानच्या प्रसिद्ध शिंकानसेन ( Japanese Shinkansen technology ) बुलेट ट्रेन तंत्रज्ञानावर आधारीत आहे.

28 सेस्मोमीटरचा वापर ( Seismometers )

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किमीच्या मार्गाशेजारी 22 सेस्मोमीटर बसविण्यात येणार आहेत. त्यातील आठ सेस्मोमीटर महाराष्ट्रात बसविण्यात येणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, विरार आणि बोयसर येथे ही सेस्मोमीटर बसविले जाणार आहेत. तर 14 सेस्मोमीटर गुजरात राज्यात बसविण्यात येणार आहे. वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आणंद, महेमदाबाद आणि अहमदाबाद येथील बुलेट ट्रेन मार्गाशेजारील ट्रॅक्शन सब स्टेशन आणि स्विचींग पोस्टमध्ये हे सेस्मोमीटर बसविले जातील.

भूकंपप्रवण क्षेत्रातही सेस्मोमीटर

उर्वरित सहा सेस्मोमीटर महाराष्ट्रातील भूकंपप्रवण क्षेत्रात जसे खेड, रत्नागिरी, लातूर आणि पांगरी तसेच गुजरातच्या अडेसर आणि ओल्ड भुज येथे बसविण्यात येणार आहेत. गेल्या शंभर वर्षात बुलेट ट्रेनच्या मार्गाजवळ जेथे 5.5 रिश्टरस्केलहून मोठा भूकंप आला आहे अशा क्षेत्राचे जपानच्या तज्ज्ञांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. यासंदर्भातील विस्तृत सर्वे आणि सॉईल स्टेबिलिटी स्टडी मायक्रो थ्रमर टेस्टद्वारे करून या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.