आमदार मंगेश चव्हाण यांचा खडसेंचं नाव न घेता खळबळजनक दावा

"ज्यांच्या हातात आज एकही ग्रामपंचायत नाही ते एकनाथ खडसे कुठे आणि राज्यातल्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाचा घटक असलेले गिरीश महाजन कुठे? आपल्यासोबत असणारा सहकारी गिरीश महाजन किती लांब चालला गेले. खडसेसाहेब कुठे तुणतुणे वाजवता? आपल्यातील कोणीतरी पुढे गेल्याची खंत खडसे यांच्या मनात आहेत", अशी टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.

आमदार मंगेश चव्हाण यांचा खडसेंचं नाव न घेता खळबळजनक दावा
| Updated on: Dec 02, 2023 | 9:04 PM

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 2 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात चाळीसगाव कनेक्शन असून चाळीसगावातील बडे नेत्यांच्या फोनची चौकशी करावी, अशी मागणी जाहीरपणे भाषणात केली होती. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यावर चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उत्तर देताना खळबळजनक दावा केलाय. “मी सार्वजनिकरित्या माझ्या फोनचा सीडीआर जाहीर करतो. एकनाथ खडसे यांनीही तो जाहीर करावा. गेल्या काही दिवसांपूर्वी भुसावळमधील ड्रग्ज प्रकरणात जी नावे समोर आली होती ती कुणाच्या संबंधित होती?”, असा सवाल करत मंगेश चव्हाण यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्याकडे संशयाचे बोट दाखवत खळबळजनक दावा केला.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात चाळीसगावमधील राजकीय पदाधिकाऱ्यांची चौकशीची मागणी करणाऱ्या एकनाथ खडसे यांना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिलं आहे. “मी माझ्या फोनचा सीडीआर सार्वजनिकरित्या जाहीर करतो. एकनाथ खडसेंनीही त्यांचा फोनची सीडीआर सार्वजनिकरित्या जाहीर करावे”, असं चॅलेज मंगेश चव्हाण यांनी दिलं आहे. “चोरी कशी करायची? याचं ट्रेनिंग सेंटर एकनाथ खडसे यांनी सुरू केलं पाहिजे”, अशी टीकादेखील मंगेश चव्हाण यांनी यावेळी केली.

‘तो एकनाथ खडसे यांचा पारिवारीक आक्रोश मोर्चा’

“राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा हा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नव्हता तर तो एकनाथ खडसे यांचा पारिवारिक आक्रोश मोर्चा होता”, अशीही टीका मंगेश चव्हाण यांनी केली. “राष्ट्रवादीचा मोर्चा हा एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला वाचवण्यासाठी आक्रोश मोर्चा होता”, अशी घणाघाती टीका मंगेश चव्हाण यांनी केली.

‘एवढा निर्लज्ज माणूस आहे की…’

“एवढा निर्लज्ज माणूस आहे की त्यांच्या कुटुंबातील एक जण जेलमध्ये होता. त्यांना आता गौण खनिज प्रकरणात दंडाची नोटीस आली आहे. चोरी कशी करायची याचे ट्रेनिंग सेंटर एकनाथ खडसे यांनी सुरू केले पाहिजे”, अशा शब्दांत मंगेश चव्हाण यांनी निशाणा साधला.

‘याचे परिणाम खडसे भोगतायत’

“ज्यांच्या हातात आज एकही ग्रामपंचायत नाही ते एकनाथ खडसे कुठे आणि राज्यातल्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाचा घटक असलेले मंत्री गिरीश महाजन कुठे? आपल्यासोबत असणारा सहकारी गिरीश महाजन किती लांब चालला गेले. खडसेसाहेब कुठे तुणतुणे वाजवता? आपल्यातील कोणीतरी पुढे गेल्याची खंत खडसे यांच्या मनात आहेत. याच इर्षेतून ते कायम गिरीश महाजन यांना टार्गेट करत असतात. यामुळेच आज ते कुठे आहेत, याचे परिणाम खडसे भोगतायत”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.