सासऱ्यांना सोबत घेणार की विरोधात लढणार? रक्षा खडसे बघा काय म्हणाल्या?

आगामी लोकसभा निवडणुकीत अतिशय रंजक अशा राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. सत्तेत सध्या तीन पक्ष एकत्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. असं असताना आगामी काळात रावेर लोकसभा मतदारसंघात सासरे एकनाथ खडसे आणि सून रक्षा खडसे यांच्यात राजकीय लढाई होणार का? या प्रश्नावर रक्षा खडसे यांनी भूमिका मांडलीय.

सासऱ्यांना सोबत घेणार की विरोधात लढणार? रक्षा खडसे बघा काय म्हणाल्या?
raksha khadse
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2024 | 2:50 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 23 फेब्रुवारी 2024 : खासदार रक्षा खडसे यांचा रावेर लोकसभेवर दावा कायम आहे. रक्षा खडसे गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण आगामी लोकसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. कारण रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खडसे कुटुंबातील सासरे आणि सून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार की आपापसातले मतभेद बाजूला सारुन एकत्र येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर रक्षा खडसे यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “माझा रावेर लोकसभेवर दावा तर राहीलच. कारण पक्षाने मला दोन वेळा संधी दिली. तसेच लोकांनी देखील मला चांगल्या मताधिक्यांनी निवडून दिलं होतं. मात्र शेवटी उमेदवारीचा विषय वरिष्ठ आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील. जो आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही सर्व पालन करू आणि काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी रावेर लोकसभेची जागा जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

“पक्ष संघटनेने मंत्री गिरीश महाजन किंवा इतर उमेदवार दिला तरीही आदेशाने आम्ही सर्व काम करू. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणू. इतर यादीत माझंही नाव असू शकतं. त्यामुळे आम्ही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करू. या ठिकाणी कुण्या एका व्यक्तीसाठी काम होणार नाही. तर पक्षासाठी काम केलं जाईल. आमच्यात कुठलाही उमेदवारीबाबत वाद नाही. ज्याला कोणाला तिकीट दिलं जाईल त्याचं आम्ही काम करू”, अशी भूमिका रक्षा खडसे यांनी मांडली.

सासरा विरुद्ध सून अशी लढत बघायला मिळेल का?

आपल्या तिकीटाबाबत काही दिल्ली दरबारी चर्चा झाली का? असा प्रश्न रक्षा खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “भारतीय जनता पक्षामध्ये लॉबिंग हा शब्दच नाही. पक्षाचं काम करत राहा. पक्ष संधी देत राहतं”, असं रक्षा खडसे यांनी सांगितलं. यावेळी रक्षा खडसे यांना रावेर लोकसभेत सासरा विरुद्ध सून अशी लढत बघायला मिळेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अजून अशी कुठलीही अधिकृत चर्चा नाही. दोन्ही पक्षाकडून आदेश नाहीत. चित्र स्पष्ट झाल्यावर या विषयावर बोललेलं बरं”, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.

“महाराष्ट्रात आणि इतर राज्यात इतर पक्षाचे नेते भाजपमध्ये येत आहेत. अशोक चव्हाण यांचा देखील भाजपात पक्षप्रवेश झालाय. नाथाभाऊ भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच आहे. आधीही नाथाभाऊ हे भारतीय जनता पार्टीचे नेतेच होते. ते आल्याने आनंद होईल आणि कोणीही भाजपमध्ये आलं तर त्याचं स्वागतच केलं जाईल”, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली. “भाजपने रावेर लोकसभेबाबत खासदार रक्षा खडसे यांना तिकीट द्यावं किंवा न द्यावं हा विषयचं नाही. रावेर लोकसभेतील जनतेचा आणि मतदारांचा एकच कल तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याचा आहे. याशिवाय माझाही काही हट्ट नाही की मलाच तिकीट दिलं पाहिजे”, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.