जळगावात कुत्र्यांच्या भुंकण्यावरून राडा, महिलेने चार-पाच जणांना बोलावलं आणि स्थानिकांवर दगडफेक
जळगावच्या विद्या नगरात कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादात पाच ते सहा जणांनी नागरिकांवर दगडफेक करून लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केली. या मारहाणीत एका जणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप आहे.

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव : जळगावातील विद्या नगरात कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून गल्लीत राहणाऱ्या नागरिकांवर दगडफेक करत लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा भुंकत आहे. त्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून कुत्रा मालक महिलेच्या सांगण्यावरून पाच ते सहा जणांनी गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी नागरिकांनी केला आहे. या दगडफेकीत एका जणाच्या डोळ्याला दगड लागून गंभीर दुखापत झाली आहे. तसेच आणखी तीन जण जखमी झाले आहेत. मारहाणीत जखमी झालेल्या तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महिलेचा कुत्रा हा लहान मुलांवर धावून आला. त्यावर त्या महिलेला परिसरातील काही नागरिकांनी कुत्रा आवरण्याचे सांगितल्याने त्यावरून वाद झाल्याची माहिती जखमी व्यक्तींनी बोलताना दिली आहे. या वादात कुत्र्याची मालक असलेल्या महिलेने तिच्या ओळखीच्या पाच ते सहा जणांना बोलावलं. त्या सर्वांनी परिसरातील नागरिकांना दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची माहिती जखमी व्यक्तींनी बोलताना दिली आहे.
या घटने प्रकरणी जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




नेमकं काय घडलं? जखमी व्यक्तीने सांगितला घटनाक्रम
या घटनेतील एका जखमी व्यक्तीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महिलेने जवळपास चार ते पाच कुत्रे पाळले आहेत. त्यातील एका कुत्र्याने काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीला चावण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या एकाच्या मुलाला चावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वाद झाला होता. आजही त्या महिलेचं याच विषयावरुन भांडण सुरु होतं. आम्ही आवाज ऐकूण तिथे बघायला गेलो होतो. यावेळी वेगळाच प्रकार बघायला मिळाला. महिलेने तिच्या ओळखीच्या सात ते आठ जणांना बोलावलं होतं. त्यांच्या हातात धारधार शस्त्रे होती. त्यांच्याकडे शस्त्र असल्याने आम्ही तिथून लांब गेलो. पण त्यांनी आमच्यावर दगडफेक केली”, अशी प्रतिक्रिया जखमी व्यक्तीने दिली.