BREAKING : मोठी बातमी! फक्त शिंदे गटच नाही, एकनाथ खडसे देखील गुवाहाटीला जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या सर्व 50 बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

BREAKING : मोठी बातमी! फक्त शिंदे गटच नाही, एकनाथ खडसे देखील गुवाहाटीला जाणार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 17, 2022 | 6:49 PM

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या सर्व 50 बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील गुवाहाटीला जाणार आहेत. खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिलीय. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाच्या पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या चर्चेवर चांगलेच चिमटे घेतले आहेत.

“मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे, आणि परत आमचं सरकार येऊ दे, असं साकडं घालणार”, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खडसे बोलत होते

“40 बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी आहे”, असा चिमटा देखील खडसेंनी पुन्हा एकदा काढला.

‘भेट तुझी माझी प्रेमाची’, एकनाथ खडसेंची शिंदेंवर काव्यमय टीका

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी नुकतंच मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन काव्यमय शब्दांमध्ये टीका केली होती.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते. भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंज वाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत 40 आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची”, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली होती.