Jalgaon News: शेतकऱ्यांनी सरकारला परत दिले मदतीचे चेक, कारण काय?
शेतकऱ्यांनी सरकारने केलेली 5000 रुपयांची मदत आणि त्यामध्ये आणखी रक्कम ॲड करून 11 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिल्याची माहिती स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

किशोर पाटील, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी
Jalgaon News: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी सरकारने दिवाळीनिमित्त केलेली 5000 रुपयांची मदत करावी असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. गिरीश महाजन यांच्या या आवाहनावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र आता गिरीश महाजन यांच्या या आवाहनाला जळगावमधील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून जामनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून पाच हजारांच्या मदतीचे धनादेश परत केले आहेत.
जळगावमधील शेतकऱ्यांनी परत केली मदत!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनाला जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जामनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सरकारने दिवाळीसाठी दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश परत केले आहेत. या शेतकऱ्यांनी सरकारने केलेली 5000 रुपयांची मदत आणि त्यामध्ये आणखी रक्कम ॲड करून 11 हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिल्याची माहिती स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
मंत्री गिरीश महाजनांचा रोहित पवारांवर पलटवार!
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या टिकेचाही चांगलाच समाचार घेतला. “रोहित पवार हे नौटंकी आहेत. रोहित पवार यांना बोलताना लाज वाटली पाहिजे. रोहित पवार तुम्हाला मदतीचे 5 हजार आले तर ते ठेवायला तुम्हाला लाज वाटणार नाही? अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला मदतीची आवश्यकता नाही परत करतो,अशा सधन शेतकऱ्यांना जर पैसे परत करायचे म्हटलं तर यामध्ये लाज वाटण्यासारखे आहे,” असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
तसेच “रोहित पवार तुम्ही आमच्या जिल्ह्यातल्या चोपडा साखर कारखान्याचे कामगारांचे पावणे तीन कोटी देत नाही. या कामगारांना तुम्ही उडवाउडवीचे उत्तर देतात, कामगारांचे पैसे परत करण्याबद्दल तुम्हाला लाज वाटत नाही का? नुसता शेतकऱ्यांबद्दल टेंभा तुम्ही मिरवता कामगारांचे पैसे बुडवताना तुम्हाला थोडीशी लाज वाटत नाही का? शेतकरी पैसे परत करत असतील तर या बाबाला (रोहित पवार) लाज वाटण्यासारखे काय?” अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.