केळी उत्पादकांवर अस्मानी संकट; बैलगाड्या भरून केळी जनावरांना पुढे फेकली…

| Updated on: Jun 25, 2023 | 3:36 PM

काही शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना, मेंढ्यांना खाण्यासाठी बैलगाडी व ट्रॅक्टर भरभरून केळी फेकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

केळी उत्पादकांवर अस्मानी संकट; बैलगाड्या भरून केळी जनावरांना पुढे फेकली...
Follow us on

जळगाव : राज्यातील शेतकरी कधी नैसर्गिक संकटात आहे, तर कधी पडलेल्या बाजारभावामुळे उत्पादक शेतकरीराजाच आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कधी पावसाचे संकट तर कधी पाऊस नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना ज्या प्रमाणे समस्या उद्धभवत आहेत, त्याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरीही मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे आता केळी उत्पादक शेतकऱ्यांनी हातातोंडाशी आलेला घास जनावरांपुढे टाकला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळीला भाव नसल्यामुळे सातत्याने अस्मानी संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आता केळीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने चांगल्या दर्जाची केळी शेतकऱ्यांनी आता जनावरांपुढे टाकली आहेत.

केळीचे घड जनावरांसमोर

केलेला खर्चही आलेल्या पिकांतून निघत नसल्याने आता शेतकऱ्यांनी आता करायचे काय असा सवालच त्यांनी सरकारला केला आहे. शेतकऱ्यांनी बैलगाड्याच्या बैलगाड्या भरून केळी जनावरा पुढे टाकली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर काही शेतकऱ्यांनी मेंढ्या, गुरे-ढोर बकऱ्यांसमोरही केळीचे घड टाकले आहेत.

केलेला खर्चही निघत नाही

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वारंवार संकट येत असल्याने आता उत्तर महाराष्ट्रातील जळगावचे केळी उत्पादक पाठ फिरवण्याचे चित्र निर्माण झाले आहे. केळी पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने आता केळी उत्पादन घ्यायचे की नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे. केळीला भाव नाही, तर व्यापारी शेतकऱ्याकडून तीनशे-चारशे रुपये क्विंटल दर मागण्यात येत आहे, त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने त्यांच्यावर संकट कोसळत आहे.

शेतकरी हवालदिल

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून केळीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. एकीकडे आस्मानी संकटात तर दुसरीकडे केळीला भाव नसल्याने कापणीवर आलेले केळीला शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिले आहे.

केळी उत्पादनाकडे ‘पाठ’

तर काही शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना, मेंढ्यांना खाण्यासाठी बैलगाडी व ट्रॅक्टर भरभरून केळी फेकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तर महाराष्ट्रातील जळगावचे केळी उत्पादक केळी उत्पादनाकडे पाठ फिरवण्याचे चित्र यावरून निर्माण झाले आहे.