जळगावच्या सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांकडे व्यक्त केली खदखद, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी

आमदार चिमणराव पाटील यांनी सर्व आमदारांना समसमान निधीचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांना थेट जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्या जाणाऱ्या निधीचा मंत्र्यांना हिशोबच मागितला.

जळगावच्या सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांकडे व्यक्त केली खदखद, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी
गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन
| Updated on: Jul 26, 2024 | 1:34 AM

निधी वाटपात दुजाभाव झाल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जळगावच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत मंत्र्यांकडे खदखद व्यक्त केली. जळगावच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच महायुतीमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन या मंत्र्यासमोर निधी देण्यात दूजाभाव होत असल्याची नाराजी बोलून दाखवली. जळगाव जिल्ह्याची या सरकारच्या कार्यकाळातील शेवटची जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी (25 जुलै) पार पडली.

आमदार चिमणराव पाटील यांनी सर्व आमदारांना समसमान निधीचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्र्यांना थेट जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्या जाणाऱ्या निधीचा मंत्र्यांना हिशोबच मागितला. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदारांना आतापर्यंत किती निधी दिला? त्यांची यादी सादर करावी, असा आदेश दिला.

“आम्ही मंत्री आहोत. व्यासपीठावर बसलो आहे म्हणून आम्हाला तुमच्यासारखं बोलता येत नाही”, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना उत्तर दिलं. एकीकडे निधी दिला नाही म्हणून सत्ताधारी मंत्री यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या विषयी नाराजी व्यक्त केल्याचा विषय गाजत आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात सुद्धा निधी वाटपात दूजाभाव केला जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केल्याने चर्चेचा विषय बनला आहे.