Jalna Politics: एकनाथ शिंदेंना धक्का! दौऱ्याआधीच पक्षाला खिंडार, तालुकाध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
जालन्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व पदाधिकार्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

रामनाथ ढाकणे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी:
Jalna Politics News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते शेतकरी बांधवांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असतानाच जालन्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील मंठा परतूर विधानसभा मतदार संघात तालुका प्रमुखांसह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधी मोठा धक्का!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. जालन्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व पदाधिकार्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
जालन्यात पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे!
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आसाराम बोराडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते पक्षाचे जिल्हाप्रमुख झाले. मात्र आसाराम बोराडे हे पदाधिकाऱ्यांना डावलत पक्षाचे सर्व कार्यक्रम करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळेच जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन तालुकाप्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा देत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर!
राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा पाहायला मिळत असून शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक अडचणींचा सामना करत आहेत. राज्यातील नागरिक संकटात असताना त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. जालन्यातील मौजपुरी येथे श्री. रामेश्वरी महादेव संस्थान याठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत त्यांच्या व्यथा ऐकून घेणार आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा या गावामध्ये मुक्काम ठोकला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केले स्नेहभोजनही केले. त्याचप्रमाणे आता उपमुख्यमंत्री शिंदेही शेतकऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार आहेत.