Jalna | ओढ्याच्या काठी दप्तर दिसले, गावकऱ्यांचा ठोका चुकला, जालन्यात तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने मुलांचा शोध घेण्यात आला. एकाच गावातील तीन घरांमध्ये अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण सकनपुरी गावावर सध्या शोककळा पसरली आहे.

Jalna | ओढ्याच्या काठी दप्तर दिसले, गावकऱ्यांचा ठोका चुकला, जालन्यात तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
अजय टेकाळे, करण नाचण, उमेश नाचण अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 12:23 PM

जालनाः शाळा सुटल्यावर पोहायचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी (School children drown) मुलांबाबत अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला. हे तिघेही ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. काल गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 10 ते 13 वर्षे वयोगटातील ही मुले शाळा सुटल्यावर ओढ्यावर पोहण्यासाठी गेली, मात्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही तिन्ही मुले जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील (Partur) आष्टी जवळील सकनपुरी गावातील होती. गावातील ओढ्यावर मुलांची दप्तरं आढळून आली. त्यावरून त्यांचा शोध घेण्यात आला.

सकनपुरी गावातील घटना

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारी ऊन चांगलेच तापू लागले आहे. जालना जिल्ह्यातील तापमानाचा पाराही वाढलेला आहे. यामुळेच सकनपुरी गावातील ही मुले शाळा सुटल्यावर थंडाव्यासाठी ओढ्याकडे पोहायला गेली असावीत. परतूर तालुक्यातील आष्टी जवळील सकनपुरी गावातील ही तिन्ही मुले जिल्हा परिषद शाळेत शिकत होती. शाळा सुटल्यानंतर पोहण्यासाठी ते दुपारी चार वाजता ओढ्याकडे गेले. मात्र त्यानंतर संध्याकाळी झाली तरी ते घरी परतलेच नाहीत. त्यामुळे पालकांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. शाळेच्या रस्त्यातील ओढ्यावर त्यांचे दप्तर दिसून आले.

मृत तिघांची नावे काय?

अजय टेकाळे, करण नाचण, उमेश नाचण अशी या मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. शाळेच्या वाटेतील ओढ्याच्या काठावर या तिघांचेही दप्तर आढळून आल्याने गावकऱ्यांना शंका आली. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने मुलांचा शोध घेण्यात आला. एकाच गावातील तीन घरांमध्ये अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडल्यामुळे संपूर्ण सकनपुरी गावावर सध्या शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या-

AAP MVA : आप आमदार की आघाडी सरकार? एकीकडे आमदारांना मुंबईत 300 घरं, दुसरीकडे 1 रुपया

लग्नाला न लागो दृष्ट; करा विम्याचं औक्षण! विवाह विम्यामुळे नुकसानीपासून व्हा तणावमुक्त!