धक्कादायक! अंतरवाली सराटीत अवैध दारूचा सुळसुळाट, महिलांचा संताप, जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने धाव… मग घडलं काय?

Antarwali Sarati Illegal Liquor Trade: मराठा आरक्षणामुळे देशभरात चर्चेत असलेल्या अंतरवाली सराटीला एक ग्रहण लागले आहे. सराटीत अवैध दारूचा सुळसुळाट आहे. महिलांनी याविरोधात संताप व्यक्त केला. काय आहे याविषयीची आपडेट?

धक्कादायक! अंतरवाली सराटीत अवैध दारूचा सुळसुळाट, महिलांचा संताप, जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने धाव... मग घडलं काय?
अंतरवाली सराटीत अवैध दारूचा सुळसुळाट
| Updated on: Jul 08, 2026 | 1:33 PM

राम दखने, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्याच्या केंद्रस्थानी आलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारीने खळबळ उडाली. त्याची तातडीने जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दखल घेतली. ग्रामभेट दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील विविध समस्या जाणून घेतल्या.यावेळी ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीसह पाणी,आरोग्य,शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांबाबत अनेक तक्रारी मांडल्या.

जिल्हा परिषद शाळेविषयी तक्रारीचा सूर

दरम्यान,जिल्हा परिषद शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या दर्जावरही जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित सरपंचाला जाब विचारला.दिवसभर चाललेल्या या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासकीय कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट घेऊन चौथीच्या विद्यार्थ्याचा गणिताचा तास घेतला. एका विद्यार्थिनीने गणिते अचूक सोडवल्याने तिचे त्यांनी विशेष कौतुक केले. इतर विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी महिला, तरुण, अबालवृद्ध, महिला बचत गट यांच्याशी संवास साधला. यावेळी गावातील महिलांनी अवैध दारू विक्री आणि त्रासाचा पाढा वाचला. जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेत अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. बैठकीत ग्रामस्थांनी घरकुल योजना, विहीर मंजुरीसाठी होणारी लाचखोरी, स्मशानभूमी आणि सांडपाण्याची समस्या याविषयी तक्रार केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि अंगणवाडीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या निदर्शनास अनेक त्रुटी आल्या. जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामात गुणवत्तेविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. शाळेसमोर पेव्हर ब्लॉक बसवण्याची सूचना त्यांनी केली. अंगणवाडीतील मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ती स्थालांतरीत करण्याची सूचना त्यांनी दिली. तर वडीगोद्री-भांबेरी रस्त्याचे काम एकाच ठिकाणी तीनदा करून बिलं लाटल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला, त्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. सौंदलगाव खुर्द येथे 20 वर्षांपासून प्रलंबित शेतरस्ता खुला केल्याबद्दल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आर. रंगमंजू, एसडीएम उमाकांत पारधी, तहसीलदार सोमेश मोहिते, बीडीओ ज्योती कवडदेवी, मंडळ अधिकारी संदीप नरूटे, तलाठी योगेश गुरव, आणि उपसरपंच आनंद तारख हे उपस्थित होते.

Follow Us