एक दुचाकी, चार मित्र अन् भरधाव मालवाहू वाहनाची धडक, चौघांचा दुर्दैवी अंत, जळगावात शोककळा

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका भीषण रस्ते अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहूर-जामनेर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईतजवळ भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

एक दुचाकी, चार मित्र अन् भरधाव मालवाहू वाहनाची धडक, चौघांचा दुर्दैवी अंत, जळगावात शोककळा
jalgaon accident
| Updated on: Nov 26, 2025 | 9:19 AM

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यावर मंगळवारी रात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातामुळे शोककळा पसरली आहे. पहूर-जामनेर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ एका भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जामनेर शहरातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर पुण्यात मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात झालेल्या या अपघातात चार तरुणांचा बळी गेला. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या मित्रांवर भरधाव मालवाहू वाहनाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे काळाने घाला घातला. रात्री अंदाजे १०.३० वाजता पहूर-जामनेर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत येथील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेरहून पहूरकडे जाणारे मालवाहू वाहन ट्रक वळणावर वेगात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला थेट धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी आणि त्यावरील तरुण अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले. त्यांना डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्याने जागीच जीव गमवावा लागला.

यात अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकिरा साबळे आणि रवी सुनील लोंढे या चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण २० ते २२ वयोगटातील मित्र होते. ते जामनेर शहरातील जामनेरपुरा आणि भीमनगर येथील होते. चारही जण मित्र असून त्यांच्या अचानक जाण्याने जामनेर शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

याप्रकरणी पहूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. या अपघातात मालवाहू वाहनाचा चालक जुबेर कुरैशी हा देखील जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी चारही मृतदेह जामनेर शासकीय रुग्णालयात हलवले.

पहूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अपघाताला जबाबदार असलेल्या मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण अपघाताच्या प्रत्यक्ष कारणांचा आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात तीन जण जखमी

तर दुसरीकडे पुण्यात डेक्कन परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गरवारे कॉलेज शेजारी झालेल्या या दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.