तवायफों के कोठे बंद करने आए थे, मगर… जयंत पाटलांची भरसभेत शेरोशायरी, भाजपवर जहरी टीका

भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी सांगलीत केली. सत्तेसाठी भाजप एमआयएम आणि काँग्रेससोबत युती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तवायफों के कोठे बंद करने आए थे, मगर...  जयंत पाटलांची भरसभेत शेरोशायरी, भाजपवर जहरी टीका
jayant patil devendra fadnavis
| Updated on: Jan 09, 2026 | 1:31 PM

भारतीय जनता पक्षाची अवस्था सध्या पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर गावात तमाशा बंद करायला आले होते, पण तमाशाचा नाद त्यांना असा काही लागला की, शेवटी तेच तुणतुणं घेऊन फडावर सर्वात पुढे उभे राहिले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. ते सांगलीत बोलत होते.

जयंत पाटलांनी घेतला शायरीचा आधार

सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ एक सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपच्या बदलत्या राजकीय भूमिकेचा समाचार घेताना शायरीचा आधार घेतला. ये बंद करने आए थे तवायफों के कोठे मगर; सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे…” असा शेर त्यांनी ऐकताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी संपूर्ण मैदान दणाणून सोडले.

यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे

जयंत पाटील यांनी अकोट येथील एमआयएम (MIM) आणि अंबरनाथमधील काँग्रेससोबतच्या भाजपच्या युतीवर बोट ठेवले. ते म्हणाले, भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेते. मात्र अकोल्यात त्यांनी ज्या एमआयएम आणि ओवेसींवर नेहमी टीका केली, त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. सत्तेसाठी कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसायला यांना काही वाटत नाही. यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, हे आता जनतेने ओळखावे, असे जयंत पाटील म्हणाले.

भाजप आज स्वतःच काँग्रेसयुक्त झाला

यावेळी जयंत पाटील यांनी १९९६ सालच्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपला सर्वाधिक जागा असूनही त्यांनी तत्त्वासाठी बहुमत नसताना सत्ता सोडली होती. पण आजचा भाजप केवळ सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसमधील नेत्यांना फोडून पक्षात घेत आहे. काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणारा भाजप आज स्वतःच काँग्रेसयुक्त झाला आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी निशाणा साधला.

सांगलीतील जनता विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभी

सांगली शहरात झालेली विकासकामे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच झाली असल्याचे जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितले. रक्त तपासणीसाठी मोफत व्यवस्था, बचत गटांसाठी बाजार कट्टा, वंदेश वाडी हॉस्पिटलसाठी ५ कोटींचा निधी, कृष्णघाट आणि सांगली-मिरज रस्ते ही आमची कामे आहेत. सांगलीची स्वाभिमानी जनता सत्तेच्या अमिषाला बळी न पडता विकास करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल असा दावा केला. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत आम्ही एकत्रित ताकदीने मैदानात उतरलो आहोत. सांगलीकरांची विवेक बुद्धी जागृत आहे, त्यामुळे महापौर आमचाच होईल, असे जयंत पाटील म्हणाले.