Sharad Pawar Health Update : महाराष्ट्रात 10 तारखेनंतर शरद पवार काय करणार? जयंत पाटील यांनी केलं जाहीर
Sharad Pawar Health Update : या भेटीचे फोटो, व्हिडिओ समोर आलेत. त्यात पवार आणि पटेलांमध्ये एक संवाद आहे. 10 तारखेनंतर बोलू. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे की, शरद पवार 10 तारखेनंतर काय करणार?.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी काल ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांना याआधी पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. तिथून डिस्चार्ज घेतल्यानंतर शरद पवारांना लगेच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेकांना प्रश्न पडला की डिस्चार्ज घेतल्यानंतर शरद पवारांना पुन्हा रुग्णालयात का दाखल केलं? दरम्यान आता शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. काल प्रफुल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो, व्हिडिओ समोर आलेत. त्यात पवार आणि पटेलांमध्ये एक संवाद आहे. 10 तारखेनंतर बोलू. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे की, शरद पवार 10 तारखेनंतर काय करणार?.
पटेल-पवार भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीचं पुन्हा विलिनीकरण होणार, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. “शरद पवार यांची प्रकृती ठिक आहे. 10 मिनिटं चर्चा झाली, 10 नोव्हेंबरनंतर ते अलीबागला कार्यकर्मासाठी येणार आहेत” असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात दिवाळीनंतर मोठ्या घडामोडी घडतील
“दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. याबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका मांडली आहे. केवळ अफवा पसरवल्या जात आहेत” असं जयंत पाटील यांनी सांगितलं. “गोकुळमध्ये घेतलेला निर्णय लोकशाहीला अभिप्रेत असलेला नाहीय. कायद्याचा दुरुपयोग आहे” असं जयंत पाटील म्हणाले. “महाराष्ट्रात दिवाळीनंतर मोठ्या घडामोडी घडतील. महाविकास आघाडीचं भविष्य उज्वल आहे” असं जयंत पाटील म्हणाले.
कोण-कोण शरद पवारांना भेटलं?
शरद पवार यांना उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो. काल शरद पवारांचा रुग्णालयातील फोटो समोर आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे. आज सकाळी बाळासाहेब थोरात, उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा त्यांना काल भेटले.रुग्णालयातील व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार या सुद्धा पवारांच्या भेटीला रुग्णालयात जाणार आहेत.