
कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंदच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. यांच्या बापाचं राज्य आहे का? लोकांनी कधी काय खावं आणि काय विकावं याला कायद्याने काही बंदी आहे का? हा काय तमाशा आहे? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
लोकांनी कधी काय खावं आणि काय विकावं याला कायद्याने काही बंदी आहे का? हा काय तमाशा आहे? बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. मनुष्य प्राणी याच्या दाताची रचना बघितली तर, कोणाला ही विचारा ती मांसाहारी आहे की नाही? हजारो वर्षांचा इतिहास आहे माकडापासून आपली उत्पत्ती झाली, तुम्ही जर दाताची रचना पाहिली तर कळतं की तुम्ही मांसाहारी आहात.
ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात, हा काय तमाशा आहे? कल्याण, डोंबिवलीमध्ये बहुजन समाजाला विरोध होतोय, माझा तर विचार आहे, त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवावी. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा असा जोरदार हल्लाबोल यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री प्रताप सरनाई यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. पहिली प्रयोगशाळा त्यांच्याच मतदारसंघात झाली, जैन धर्माच्या नावाने मच्छी मटनाचे दुकान बंद करण्यात आले, सरनाईक यांच्या पत्नी मांसाहार खूप सुंदर बनवतात. मी अनेकदा त्यांच्या हातचं जेवलो आहे, त्यांना विचारावं की तुम्ही बनवणं बंद करणार आहात का? नेत्यांची पोर बाहेर जाऊन कुठल्या प्राण्याचे मटन खातात हे मला माहिती आहे, लोकप्रतिनिधी नाही तर आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असंही यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी सरकारवर यावेळी निशाणा साधला.