सराफाला घरी बोलवले, टीव्हीचा आवाज वाढवला नंतर जे घडलं ते… डोंबिवली हादरलं

डोंबिवलीत एका ज्वेलर्स मालकाला लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दागिने ऑर्डर देण्याच्या बहाण्याने एका महिलेने व्यापाऱ्याला घरी बोलावले. तिथे दोन आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून दोरीने बांधले.

सराफाला घरी बोलवले, टीव्हीचा आवाज वाढवला नंतर जे घडलं ते... डोंबिवली हादरलं
dombivali
| Updated on: Nov 24, 2025 | 9:57 AM

कल्याण-डोंबिवली परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता चोरांकडून व्यापाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. डोंबिवली पूर्वेकडील एका ज्वेलर्स मालकाला अॅडव्हान्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलवून बेदम मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आरडाओरडा बाहेर ऐकू येऊ नये म्हणून आरोपींनी टीव्हीचा आवाज मोठा केला. यावेळी ज्वेलर्स मालकाला दोरीने बांधून त्याची ३ तोळ्यांची सोन्याची चैन आणि ५० हजार रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लुटला.

नेमकं काय घडलं?

डोंबिवलीतील वराही ज्वेलर्सचे मालक नारायणलाल रावल यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी ६० ते ६५ वयोगटातील एक महिला रावल यांच्या दुकानात आली होती. तिने दागिन्यांची ऑर्डर दिली आणि माझी मुले तुम्हाला अ‍ॅडव्हान्स देतील, त्यासाठी घरी या असे सांगून रावल यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी आरोपींनी रावल यांना अॅडव्हान्स घेण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील आजदेगाव येथील जय मल्हार इमारतीत त्यांच्या घरी बोलावले.

रावल घरी पोहोचल्यावर तिथे दोन अज्ञात व्यक्ती हजर होते. त्यांनी आई थेरपीसाठी गेली आहे, लवकरच येईल असे सांगत रावल यांना घरात घेतले. रावल आत येताच आरोपींनी घराचा दरवाजा बंद केला. तसेच बाहेरील लोकांना कोणताही आवाज ऐकायला जाऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठ्याने वाढवला. यानंतर, आरोपींनी रावल यांना दोरीने बांधून ओलीस ठेवले. त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सुमारे ३ तोळ्यांची सोन्याची चैन आणि खिशातील ५० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लुटला. यानंतर रावल यांनी गयावया केल्यानंतर आरोपींनी त्यांना सोडून दिले.

परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेनंतर जखमी अवस्थेत नारायणलाल रावल यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका महिलेसह तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या मानपाडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.