
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात तीव्र राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. या दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दिपेश म्हात्रे यांनी आज रविवार ९ नोव्हेंबर २०२५ पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. दिपेश म्हात्रे हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र अचानक दिपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेश केल्याने शिंदे गटालाही धक्का बसला आहे.
भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वाला धक्का देत माजी नगरसेविका पूजा म्हात्रे आणि माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांना शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात सामील करून घेतले. शिंदे गटाच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश मिळाल्याने शिंदे गट नाराज झाला. यामुळे शिंदे गटाने तात्काळ आक्रमक पावित्रा घेत, पलटवार करण्याची तयारी केली. भाजपच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटाने पलटवार करत भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांना शिवसेना शिंदे गटात घेण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही दिवसांपासून म्हात्रे दाम्पत्याकडून परिसरात विकास निधी मिळत नसल्याचा आरोप केला जात होता. त्यांनी भाजपचे नेते आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे भाजपला रामराम करत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
भाजपकडून शिंदे गटाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेतल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी थेट भाजपला आव्हान दिले आहे. भाजपने युती धर्माला तिलांजली दिली आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांनीही संयम दाखवू नये. भाजप युती धर्म पाळत नसेल, तर आम्हीही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जे काम केलं, त्यामुळेच पुन्हा सरकार बसलं. पण जर शिवसेनेला विचारात घेतलं जात नसेल, आमचे नगरसेवक भाजपात घेतले जात असतील, तर साहेबांनी आता संयम सोडावा. कल्याण पूर्वतले नगरसेवक आणि आज काही डोंबिवलीतील शिवसेनेचे पदाधिकारी यांचा सुद्धा प्रवेश करून घेतला आहे. यांना युती नकोय का?, असे ट्वीट उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केले आहे.