
कल्याणमधील एका रुग्णालयात कामावर असलेल्या मराठी तरुणीला मारहाण झाल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणी चौकशी सुरु आहेत. त्यातच आता या प्रकरणाचा एक नवा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. या व्हिडीओत रिसेप्शनवर असलेल्या तरुणीने आरोपीच्या वहिनीला कानशिलात लगावल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कल्याणच्या त्या नव्या व्हिडिओवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. पहिला जो व्हिडीओ आला, त्यात तो मुलगा त्या मुलीला बेदम मारताना दिसत आहे, त्याअगोदरही काहीतरी घडले असण्याची अपेक्षा आम्हाला होती. सगळे फुटेज पोलिसांना देण्यात आले होते. मी डॉक्टरांशी बोललो. ती मुलगी त्या आईच्या कानाखाली मारताना दाखवली आहे. त्यानंतर परत तो मुलगा येतो तिला मारतो असा व्हिडीओ दाखवण्यात आला, तो ही व्हिडीओ चुकीचा आहे, असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.
अविनाश जाधव काय म्हणाले?
त्याच्या आधीचाही एक व्हिडिओ असा आहे. या व्हिडीओत त्या मुलाचे आई-वडील त्या मुलाला बाहेर ढकलत आहेत. तो मुलगा परत धावत येतोय, तिला लाथ मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर ती मुलगी रागाने उठली बाहेर गेली आणि मग कानाखाली लावली. आम्ही त्याचे समर्थन करत नाही. पण काल जो अर्धवट व्हिडीओ टाकण्यात आला. त्यामुळे त्या मुलीचे नाव खराब करण्यात आले. ही घटना महाराष्ट्रातल्या लोकांना बदनाम करण्यासाठी अर्धवट व्हिडीओ काढून दाखवण्यात आली. हा व्हिडीओ जिथून कट केला, तिथून पुढे दाखवला गेला. परंतु त्याअगोदर तो मुलगा बाहेरून आत आला, त्या मुलीला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. तिथल्या लोकांनी त्या मुलाला बाहेर ढकलले आणि त्यानंतरच त्या मुलीने उठून कानशिलात लगावली, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
“काल काही लोकांनी तो अर्धवट व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर आणला. तो दाखवण्याचा प्रयत्न केला. मराठी माणसाला हीच सुरुवात केली होती. या घटना काही पक्ष जाणूनबुजून करत आहेत. मराठीचे नाव देशभरात कसे खराब करता येईल, मराठी माणूस कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय”, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी अप्रत्यक्षपणे काही राजकीय पक्षांवर निशाणा साधला.
“मी त्या मुलीला भेटलो आहे, त्या मुलीला पाहिलं तर कळेल. त्या मुलीला ज्या प्रकारे मारले, त्याचा हे पक्ष समर्थन करत आहेत का? परवा ही घटना घडली, असे एखाद्या परप्रांतीय व्यक्तीच्या कानाखाली मारल्यानंतर धावत येणारे सदावर्ते किंवा भाजपचे नेते गायब आहेत. कारण त्यांना आदेश नाहीत, त्यांच्या पक्षाचे ते आदेशावर चालणारे लोक आहेत, त्यांना एक स्क्रिप्ट दिलेली आहे आणि ती स्क्रिप्ट ते लोक वाचतात. एक ट्विट आणि एखादा बाईट देखील नाही, या लोकांचा. एका मराठी मुलीला मारल्यानंतर कुठलाही भारतीय जनता पक्षाचा जो लोक मराठी माणसाच्या विषयी सोशल मीडियावरून गरळ ओकणारे, परप्रांतीयांचा पुरस्कर्ता येणारे लोक गायब आहेत.” अशी टीकाही अविनाश जाधव यांनी केली.
“काल जो अर्धवट व्हिडिओ एका पक्षाकडून संपूर्ण देशात फिरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या अगोदरची सत्यस्थिती दाखवण्यासाठीच आज पत्रकार परिषद घेतली आहे. आमच्या कल्याणच्या पदाधिकाऱ्यांनी (आरोपीला) पकडून दिला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पसरवणे, ते खरे असते तर आम्ही नक्कीच त्या मुलीची बाजू घेतली नसती, परंतु त्याअगोदर तो मुलगा सतत तिला मारण्याकरिता येत होता. तिला ज्या पद्धतीने मारले ते संपूर्ण देशाने पाहिले. काल अर्धवट व्हिडिओ सोशल मीडियावर एक पक्षाकडून टाकून मराठी माणसाची बदनामी करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला. तिला शिवीगाळ केलेली आहे. तुम्ही एखाद्या मुलीला अशी शिवीगाळ केली तर अपेक्षा आहे का तिने काहीच बोलायचं नाही? मराठी आहे, तिने रिॲक्ट केलं,” असेही अविनाश जाधव यांनी म्हटले.