वर गेम झोन, तळमजल्यावर अंधारी खोली, दांडी मारुन अल्पवयीन मुलं-मुली…; कल्याणच्या जॉयस्टीक जंगलमधील भयानक सत्य उघड

कल्याण पूर्वेकडील 'जॉयस्टिक जंगल' या बेकायदेशीर गेम झोनवर पोलिसांनी छापा टाकला. अल्पवयीन शाळकरी मुलांना नियमबाह्य प्रवेश दिला जात होता, तसेच प्रायव्हेट रूम्समध्ये गंभीर गैरप्रकार आणि अश्लील चाळे सुरू असल्याचे उघड झाले.

वर गेम झोन, तळमजल्यावर अंधारी खोली, दांडी मारुन अल्पवयीन मुलं-मुली…; कल्याणच्या जॉयस्टीक जंगलमधील भयानक सत्य उघड
kalyan 1
| Updated on: Nov 28, 2025 | 5:56 PM

कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोडवरील जॉयस्टीक जंगल या नावाने सुरू असलेल्या एका गेम झोनवर कोळसेवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यावेळी गेम झोनच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या बेकायदेशीर गेम झोनमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिला जात होता. तसेच प्रायव्हेट रूम्समध्ये गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार आणि अश्लील चाळे सुरू असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या कारवाईमुळे कल्याण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी काय घडलं?

कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोडवर एका बिल्डिंगच्या गाळ्यात जॉयस्टीक जंगल नावाचा गेम झोन सुरू होता. पोलिस निरीक्षक गणेश नहायदे आणि सपोनि दर्शन पाटील यांना या गेम झोनमध्ये कोणत्याही सुरक्षा उपाययोजना आणि नियमांचे पालन न करता अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश दिला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर डीसीपी (DCP) अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार कोळसेवाडी पोलिसांनी मंगळवारी या गेम झोनवर छापा टाकला.

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या धाडीदरम्यान १८ वर्षांखालील आठ अल्पवयीन मुले-मुली अंधाऱ्या खोलीत कॉम्प्युटरवर गेम खेळत असल्याचे दिसून आले. हे शाळकरी विद्यार्थी शाळा आणि ट्यूशनच्या लेक्चरला दांडी मारून येथे येत होते. या गेम झोनमध्ये कोणत्याही प्रकारची लाईटची किंवा व्हेन्टिलेशनची व्यवस्था नव्हती. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे किंवा आग लागल्यास वापरण्यासाठी अग्नीरोधक यंत्रणा किवा फायर सुरक्षा उपकरणे नव्हती. हा गेम झोन पूर्णपणे बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी न घेता चालवला जात होता.

विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

तसेच या गेम झोनच्या तळमजल्यावर एक पूर्णपणे बंद खोली आढळली. या खोलीत मुला-मुलींच्या उपस्थितीत अशोभनीय आणि आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच अल्पवयीन मुलांचा गैरवापर सुरू होता. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गेम झोन चालवणाऱ्या आणि गैरप्रकारात सामील असलेल्या तिघांना अटक केली आहे. पृथ्वीराज चव्हाण, श्रीराम चव्हाण, अमित सोनवणे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या तिघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या गंभीर घटनेनंतर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पालकांना विशेष आवाहन केले आहे. अटी आणि शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या गेमिंग झोनवर कारवाई सुरूच राहणार आहे. पालकांनीसुद्धा याबाबत सतर्क राहून आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे अतुल झेंडे यांनी सांगितले.