चांदीवर सोन्याचे पाणी, बनावट हॉलमार्क अन्… कल्याणमध्ये बंटी-बबलीचा नवा कारनामा, पोलिसही हादरले

कल्याणमध्ये चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवून आणि बनावट BIS हॉलमार्क वापरून सोनारांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबली जोडीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुणे कनेक्शनही समोर आले असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

चांदीवर सोन्याचे पाणी, बनावट हॉलमार्क अन्... कल्याणमध्ये बंटी-बबलीचा नवा कारनामा, पोलिसही हादरले
kalyan crime 1
| Updated on: Oct 07, 2025 | 8:23 AM

Kalyan Crime Story : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आता चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचे पाणी चढवून आणि त्यावर बनावट BIS हॉलमार्क लावून ज्वेलर्सना फसवण्याचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये अवघ्या तीन दिवसांत बंटी-बबलीच्या एका भामट्या जोडीने दोन ज्वेलर्सना लाखोंचा चुना लावला होता. तिसऱ्यांदाही हाच प्रयत्न करत असताना एका ज्वेलर्सच्या सतर्कतेमुळे हे दाम्पत्य कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

नेमंक काय घडलं?

अश्विनी सागर शेवाळे (३२) आणि मयूर विनोद पाटोळे (३४) अशी या बंटी-बबलीच्या जोडीची नाव आहेत. कल्याण पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठ परिसरात त्यांनी आपला डाव साधला. या दाम्पत्याचा फंडा असा होता की ते चांदीच्या वस्तूंवर सोन्याचा मुलामा चढवत असत. त्यानंतर, ते दागिने आजाराचे खोटे कारण सांगून किंवा पैशांची निकड असल्याचे भासवून ज्वेलर्सकडे गहाण ठेवत असत. या दागिन्यांवर BIS हॉलमार्कचा शिक्का असल्याने ज्वेलर्सना ते सोने खरे वाटायचे. त्यामुळे त्यांचा संशय दूर व्हायचा. याच पद्धतीने या जोडीने दोन ज्वेलर्सना सहजपणे फसवले.

आरोपींना बेड्या, पुणे कनेक्शन उघड

दोन ज्वेलर्सना फसवल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी असाच प्रयत्न करण्याचे ठरवले. मात्र एका ज्वेलर्सला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. या माहितीच्या आधारावर महात्मा फुले पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला. अखेर ठाण्यातून अश्विनी शेवाळे व मयूर पाटोळे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या.

अधिक तपास सुरु

पोलिसांनी या दाम्पत्याची कसून चौकशी केली असता, या बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का पुण्यातील शरण शिलवंत या व्यक्तीने मारून दिल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तातडीने महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने पुणे गाठत सापळा रचला. बनावट हॉलमार्क बनवून देणाऱ्या शरण शिलवंत या भामट्यालाही अटक करण्यात आली. या तिघांनी मिळून अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे, तसेच या फसवणुकीमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा अधिक तपास सध्या महात्मा फुले पोलीस करत आहेत.

पाहा व्हिडीओ