
कल्याण स्टेशन परिसर, मार्केट आणि बसस्टॉप येथे रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कल्याण वाहतूक विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. नो-पार्किंग झोनमध्ये नियम मोडणाऱ्या चक्क पोलिसांच्याच दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत वाहतूक पोलिसांनी एकूण ५८ दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली असून, यातील बहुतांश वाहनांवर पोलिस असे लिहिलेले असल्याचे समोर आले आहे.
कल्याण स्टेशन परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत विकासकामे सुरू असताना, अनेक लोक आपली वाहने मिळेल त्या मोकळ्या जागेवर, विशेषतः नो-पार्किंगमध्ये उभी करतात. यात केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेकदा पोलिसांनाही नियमांचा विसर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यातच आता स्टेशन, बसस्टॉप, कोर्ट आणि मार्केट परिसरात अनेक गाड्या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केल्या जात होत्या, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता.
वाहतूक विभागाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन निष्पक्ष कारवाई करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्याच सहकाऱ्यांच्या दुचाकींवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. पोलिस असे लिहिलेले असल्याने सहसा कारवाई होत नाही, असा एक समज असतो. पण वाहतूक पोलिसांनी हा समज मोडून काढत नियमांची अंमलबजावणी करण्यात सर्वांसाठी समानता दाखवून दिली आहे.
वाहतूक पोलीस नेहमी सामान्य नागरिकांवर कारवाई करताना दिसतात. पण उच्च पदांवर असलेल्या व्यक्तींवर सहसा कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत, वाहतूक विभागाने थेट पोलिसांच्याच गाड्यांवर कारवाई केल्यामुळे कल्याणच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या या बेशिस्त पार्किंगवर झालेली ही कारवाई अत्यंत योग्य असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
नागरिकांनी या कारवाईचे जोरात स्वागत केले असून, वाहतूक विभागाच्या या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यापुढेही ही मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सुटेल, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. रस्त्यावर चुकीच्या पार्किंगमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने उचललेले हे पाऊल शिस्त आणि नियमांचे पालन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.