Kalyan News : कल्याणमध्ये उच्छाद घालणारा तो कुत्रा अखेर जेरबंद, 130 हून अधिक नागरिकांना चावा, स्टेशन परिसरातही धूमाकूळ

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. खडकपाडा परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने १३० हून अधिक जणांना चावा घेतल्यानंतर, आता रेल्वे स्थानकावरही भटक्या कुत्र्यांनी प्रवाशांना लक्ष्य केले आहे. यामुळे नागरिक आणि प्रवासी धास्तावले असून, कल्याणमध्ये दोन दिवसांत १५० हून अधिक श्वानदंशाचे रुग्ण आढळले आहेत. या गंभीर घटनेमुळे महापालिकेच्या श्वान नियंत्रण उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Kalyan News :  कल्याणमध्ये उच्छाद घालणारा तो कुत्रा अखेर जेरबंद, 130 हून अधिक नागरिकांना चावा, स्टेशन परिसरातही धूमाकूळ
कल्याणात भटक्या कुत्र्यांची दहशत
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 10, 2026 | 9:28 AM

कल्याण शहरात (Kalyan News) भटक्या कुत्र्यांनी प्रचंड दहशत पसरवली असून त्यांचा धूमाकूळ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शहरातील खडकपाडा परिसरामध्ये काल दिवभरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 130 पेक्षा अधिक नागिरकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. कालची ही घटना अद्याप ताजी असतानाच, सोमवारी सकाळी देखील कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातही भटक्या कुत्र्याने प्रवाशांना लक्ष्य केलं आहे. सकाळपासून आत्तापर्यंत किमान 10 ते 15 लोकांना या कुत्र्याने चावा घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे कल्याणमधील नागरिक तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी चांगलेच धास्तावले असून त्यांनी कुत्र्यांचा धसका घेतला आहे. दरम्यान खडकपाडा येथए उच्छाद घालणाऱ्या त्या कुत्र्याला जेरबंद करण्यात यश मिळालं असून त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

खडकपाड्यात एका कुत्र्याचा 130 हून अधिक जणांना चावा

शहरातील खडकपाडा परिसरात काल एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणारे नागरिक, वाहनचालक आणि परिसरातील रहिवाशांना या कुत्र्याने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तब्बल 130 हून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिस, स्थानिक नगरसेवक, नागरिक आणि श्वान पकडणाऱ्या पथकाने संबंधित कुत्र्याचा शोध सुरू केला. रात्रभर शोधमोहीम राबवल्यानंतर अखेर संबंधित भटक्या कुत्र्याला पकडण्यात यश आलं. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खडकपाड्यानंतर आता कल्याण स्टेशन परिसरात हल्ले

खडकपाड्यातील श्वान हल्ल्यांची कालची घटना ताजी असतानाच आता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातही दुसऱ्या भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याचं समोर आलं. रेल्वे स्टेशन परिसरात सकाळपासून प्रवाशांवर आणि चाकरमान्यांवर कुत्र्याने हल्ले केल्याची प्राथमिक माहिती आहे. आतापर्यंत 10 ते 15 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याचे समोर आले. सकाळच्या वेळेत कामासाठी आणि प्रवासासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या हल्ल्याचा सामना करावा लागला. श्वानाच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या प्रवाशांना कामावर न जाता थेट रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावं लागलं. रेल्वे स्टेशनसारख्या कायम गर्दीच्या परिसरात भटक्या कुत्र्याचा वावर आणि त्याचे हल्ले यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

150 हून अधिक डॉग बाईटचे रुग्ण

दरम्यान, कुत्र्याच्या या हल्ल्याची तीव्रता रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णांच्या संख्येवरूनही स्पष्ट होत आहे. कल्याण परिसरात अवघ्या एका दिवसात 150 हून अधिक डॉग बाईटचे रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती आहे. यापैकी 48 रुग्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाले होते. या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यापैकी 46 रुग्णांना उपचार आणि अँटी-रेबीज इंजेक्शन देऊन घरी सोडण्यात आलं. मात्र, दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. इतर जखमी नागरिकांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे समोर आलं आहे. विशेष म्हणजे शहरातील गर्दीची ठिकाणं, रहिवासी परिसर आणि रेल्वे स्टेशन परिसरातही भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने केवळ एखादी घटना घडल्यानंतर कारवाई न करता भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us