कल्याणचा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा, विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

कल्याणच्या सूचक नाका ते नेतीवली रस्त्यावर वाढती वाहतूक आणि शाळांच्या जवळपास असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर वाहनांची बेसुमार गर्दी, वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि अनेक अपघातांच्या घटना यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत.

कल्याणचा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा, विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
| Updated on: Aug 07, 2025 | 1:54 PM

कल्याण पूर्वेतील सूचक नाका ते नेतीवली हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आता विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या रस्त्यावर वाहनांची दिवसभर मोठी गर्दी असते. याच परिसरात पाच ते सहा प्रमुख शाळा आहेत. त्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी हजारो विद्यार्थ्यांची आणि पालकांची ये-जा असते. तसेच रहदारीच्या वेळी या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मुलांना दररोज मृत्यूच्या दाढेतून मार्गक्रमण करण्यास भाग पाडत आहे.

पालकांमध्ये प्रचंड संताप

काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली. सूचक नाका परिसरातील रहिवासी मनोज वाघमारे यांचा 13 वर्षांचा मुलगा, शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडत असताना, एका भरधाव रिक्षाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलाच्या दाताला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने, त्याला मोठा अपघात टळला. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “आमची मुलं शाळेत जातात, सुरक्षित घरी परत येतील याची शाश्वती राहिली नाही,” अशी भीती अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिक आणि पालक गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडे या रस्त्यावर वाहतूक नियोजन करण्याची आणि शाळांच्या वेळेत पोलीस तैनात करण्याची मागणी करत आहेत. “आम्ही अनेकदा तक्रारी केल्या, विनंत्या केल्या. पण वाहतूक पोलीस याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत,” असे एका संतप्त पालकाने सांगितले. एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतायेत का? मोठा अपघात झाल्यावरच त्यांना जाग येणार का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची कसरत

सूचक नाका ते नेतीवली या रस्त्यावर वाहतुकीचे कोणतेही योग्य नियोजन नाही. दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागते. मुलांना अनेकदा वाहनांच्या मधून वाट काढत जावे लागते. या धोकादायक परिस्थितीमुळे पालकांनाही मुलांना शाळेत सोडताना आणि परत आणताना सतत सोबत राहावे लागते. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

या घटनेनंतर, पोलिसांनी तातडीने या समस्येची दखल घेऊन सूचक नाका आणि नेतीवली परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक पालक आणि नागरिकांनी केली आहे.