ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा

स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला बारामतीतून माघार घेण्यासाठी सांगितले होते. मात्र मी एक पोस्ट पाहिली आणि त्यानंतर मी माझा अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असे म्हटले आहे.

ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
Sunetra Pawar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 09, 2026 | 6:34 PM

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणुक आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जात होते. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवार देण्यात आला होता. कारण, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता सर्व प्रयत्न सुरु होते. नंतर काँग्रेसनेही माघार घेतली. पण स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी कायम ठेवण्याचा ठाम निर्णय स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी जाहीर केला आहे. करुणा मुंडे यांनी एका विशेष बाईटमध्ये सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मला बारामतीतून माघार घेण्यासाठी सांगितले होते. मात्र मी एक पोस्ट पाहिली आणि त्यानंतर मी माझा अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.” त्यांनी स्पष्ट केले की, “धनंजय मुंडे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलणी केल्यानंतर काँग्रेसने माघार घेतल्याची पोस्ट मी पाहिली. त्यामुळे मीही माघार घेणार नाही.”

Loading...

करुणा मुंडे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत सांगितले, “अजित पवारांना आम्हाला न्याय द्यायचा आहे, पण सुनेत्रा पवार आणि त्यांचे मुलगे अपघाताविषयी काहीही बोलत नाहीत. मोठे सत्ताधारी न्याय देऊ शकत नाहीत, त्यांना सत्तेत बसण्याचा हक्कच नाही.”

पुढे त्या म्हणाल्या की, “माझा स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय पक्ष आहे. आमचे कार्यकर्ते आम्हाला मतदान पडू द्या. मी बारामतीत हेच मुद्दे घेऊन चालणार आहे. कोणालाही न्याय मिळणार नाही असे वातावरण आहे. मी वाईट गोष्टींच्या विरोधात लढणार आहे.” करुणा मुंडे यांनी आपल्या राजकीय आदर्शाविषयीही बोलताना सांगितले, “छत्रपती संभाजीराजे हे माझे राजकारणातील आयडॉल आहेत. आपले महापुरुषांचे विचार घेऊन आम्ही चालणार आहोत.”

धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केला, “धनंजय मुंडे यांनी मला लायकी नाही असे सांगितले. त्यांनी संपर्क केल्यामुळे काँग्रेसने माघार घेतली, असे वाटते. काँग्रेसला तुम्ही विकत घेऊ शकता, पण मला नाही.”

शेवटी करुणा मुंडे यांनी आत्मविश्वासाने सांगितले, “हारले तरी मी जिंकल्यासारखीच असणार आहे. मी लढणार आहे.” तसेच त्यांनी दादांची एफआयआर लागल्याचीही माहिती दिली.
करुणा मुंडे यांचा हा ठाम निर्णय आणि सत्ताधाऱ्यांवर केलेला हल्ला बारामती पोटनिवडणुकीत नवीन वळण आणणारा ठरू शकतो. बारामतीत आता त्रिकोणी लढत होण्याची शक्यता वाढली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us