Milk Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ! दूध दरात 4 रुपयांची वाढ; पण कोणत्या अन् कधीपासून लागू होणार नवे दर?
Katraj Milk Price Hiked by ₹4 Per Litre: ग्राहकांना कात्रजचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कात्रज दूधाच्या दरात ४ रुपयांची वाढ केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला महागाईची आणखी एक कात्री लागणार आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना आता दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अर्थात कात्रज डेअरीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कात्रजच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. येत्या 16 नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज डेअरीच्या दूध उत्पादक आणि व्यावसायिक संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आतापर्यंत 62 रुपये प्रतिलिटर दराने मिळणारे कात्रजचे दूध आता 66 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाणार आहे. म्हणजेच ग्राहकांना प्रत्येक लिटरमागे चार रुपये अधिक मोजावे लागतील. विशेष म्हणजे केवळ दुधाचे दरच वाढणार नाहीत, तर कात्रजच्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ होणार आहे.
दुग्धजन्य पदार्थांचे दर सुमारे 10 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दही, ताक, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही महागाईचा फटका बसणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दूध खरेदीचा भाव आणि ग्राहकांना किरकोळ विक्रीसाठी आकारला जाणारा भाव यांच्यातील वाढती तफावत हे दरवाढीमागील महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर पशुखाद्य, वाहतूक, प्रक्रिया आणि उत्पादनाशी संबंधित इतर खर्चातही वाढ होत आहे.
या वाढत्या खर्चामुळे डेअरी व्यवसायावरील आर्थिक दबाव वाढत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दूध खरेदीचा भाव आणि किरकोळ विक्रीचा भाव यांच्यातील वाढती तफावत तसेच उत्पादन खर्चातील वाढ यामुळे दरवाढीचा विचार करावा लागल्याचे स्पष्ट केले. याआधी अमूल आणि मदर डेअरीसारख्या प्रमुख दूध ब्रँड्सनीही दूध दरात वाढ केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कात्रज डेअरीनेही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील कात्रजच्या दुधावर अवलंबून असलेल्या ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
प्रकाश कुतवळ म्हणाले की, कात्रज दुधाच्या दरात चार रुपयांनी वाढ केली आहे. खरेदीदर वाढल्याने शेतकऱ्याला हा आधार देणारा धंदा आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे दुधात अमुलाग्र बदल झाले आहेत. आमच्या पनीरच्या किमतीत वाढ झाली आहे. दुधाची क्वालिटी आम्हाला छान मिळते.
