
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात सर्पदंशाने ४ वर्षांच्या बालिकेसह तिच्या २४ वर्षीय मावशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही रुग्णांना वेळेत अतिदक्षता विभाग म्हणजे ICU मध्ये न मिळाल्याने त्यांचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
खंबाळपाडा परिसरात सर्पदंश झाल्यानंतर ४ वर्षांची प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रुती ठाकूर यांना तातडीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आयसीयू नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचाराला विलंब झाला. यामुळे त्यांची प्रकृती खालवत गेली. त्यात त्या दोघींचाही मृत्यू झाला. आयसीयू अभावी दोन जीव गेल्याने आरोग्य विभागावर नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.
यामुळे कल्याण-डोंबिवली शहराला मूलभूत आरोग्य सुविधा पुरवण्यात KDMC प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. ICU युनिट बंद पडल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला या गंभीर विषयाचा पूर्णपणे विसर पडला आहे. ICU सुरू करण्यासाठी निविदा काढल्या असल्या तरी, तांत्रिक अडचणी आणि कंत्राटदारांचा अल्प प्रतिसाद यामुळे ही प्रक्रिया वर्षभरातही पूर्ण होऊ शकलेली नाही. एका ठेकेदाराने माघार घेतल्यावर, वर्षभर प्रशासनाला दुसरा सक्षम ठेकेदार शोधता न येणे किंवा तातडीने पर्याय न काढता येणे, हे KDMC प्रशासन आणि ठेकेदार दोघेही गाढ झोपेत असल्याचे दिसत आहे.
अत्यावस्थ रुग्णांना उपचारासाठी ठाणे किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागत असल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि अनेकदा जीव गमवावा लागतो. सर्पदंश झालेल्या बालिकासह तरुणीच्या मृत्यूची घटना याच उदासीन कारभाराचा परिणाम असल्याचा आरोप केला जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लाखो रुपयांचा टॅक्स भरूनही सर्दी-खोकल्यापलीकडील आरोग्य सुविधा मिळत नसतील, तर हा टॅक्स कशासाठी भरायचा? असा संतप्त सवाल त्यांनी KDMC प्रशासनाला विचारला आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असताना, या शहरातील खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी देखील यावर ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी तातडीने ठोस भूमिका घ्यावी. तसेच व्हेंटिलेटरवर असलेली महापालिकेची आरोग्य व्यवस्था अद्ययावत करण्याची मागणी नागरिकांनी जोर लावून धरली आहे. तातडीने ICU सुरू न झाल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.