
कल्याण डोंबिवली शहर स्वच्छतेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेची धुरा महिला बचत गटांच्या हाती देण्यात आली असून त्यांना महिला मार्शल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांत या मार्शलनी तब्बल ५० हजार रुपयांचा दंड वसूल करत बेशिस्त नागरिकांना दणका दिला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त २०२५-२६ हे वर्ष महिला सक्षमीकरणाला समर्पित करण्यात आले आहे. याच धर्तीवर घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी महिला बचत गटांतील ५० महिलांना मार्शल म्हणून कार्यादेश दिले आहेत. या महिलांना केवळ कारवाईचे अधिकारच दिले नाहीत, तर वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दिला जाणार आहे. यामुळे महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरासह विविध भागांत या महिला मार्शल सध्या गस्त घालत आहेत. उघड्यावर कचरा फेकणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर या मार्शलची करडी नजर असणार आहे. घरोघरी कचरा वर्गीकरण केलं जातंय की नाही, घंटागाडीतच कचरा दिला जातोय नाही, यावरही या मार्शल नजर ठेवताना दिसत आहे. तसेच जे कोणी हे नियम मोडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
एकीकडे पालिकेने कारवाईचा बडगा उगारला असताना, दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल बिरला वन्या सोसायटीत कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विकासकाने कचरा प्रकल्प कार्यान्वित न केल्याने आणि कचरा चक्क गोडाऊनमध्ये साठवून ठेवल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे सोसायटीतील सुमारे ८०० कुटुंबांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रहिवासी आजारी पडत आहेत. सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही रहिवाशांवर घर सोडून जाण्याची वेळ आली आहे.
विकासकाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने संतप्त रहिवाशांनी सोसायटीबाहेर गाड्या आडव्या लावून निषेध व्यक्त केला. नियमानुसार, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांना स्वतःचे कंपोस्टिंग युनिट चालवणे बंधनकारक आहे. मात्र, येथे कचरा साठवून ठेवला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पालिकेच्या घनकचरा विभागाने लवकरच साईट व्हिजिट करून विकासकावर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.