वेंगुर्ल्यात एकाच व्यासपीठावर केसरकर, विनायक राऊत आणि नितेश राणे, नारायण राणे म्हणाले, नांदा सौख्य भरे!

| Updated on: Jul 12, 2021 | 1:02 AM

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यात राजकीय कार्यक्रमात जो एकमेकांना साखरेत घोळण्याचा प्रयत्न झाला त्यानं कोकणातलच नाही तर मुंबईतलही राजकारण बदलू शकतं. हे बदललेलं वातावरण सेना-भाजपला युतीपर्यंत घेऊन जाणार का हे पहाणं आता औत्सुक्याचं ठरेल

वेंगुर्ल्यात एकाच व्यासपीठावर केसरकर, विनायक राऊत आणि नितेश राणे, नारायण राणे म्हणाले, नांदा सौख्य भरे!
nitesh rane and vinayak raut
Follow us on

कोकणातलं राजकारण म्हटलं की, शिवसेना नेते आणि नारायण राणे यांच्यातले राडे डोळ्यासमोर
उभे रहातात. पण त्याच कोकणात आता राजकीय ऋतू बदलताना दिसतोय. कारण वेंगुर्ल्यातल्या
एका कार्यक्रमात आज शिवसेना नेते आणि राणे एकत्र आले होते. हा कार्यक्रम होता सागररत्न
मत्स बाजारपेठेच्या लोकार्पणाचा. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण
राणेंनी नांदा सौख्यभरे असा आशीर्वाद दिला.

नेमकं काय घडलं वेंगुर्ल्यात?
वेंगुर्ल्यात सागररत्न मत्स बाजारपेठेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. ह्या कार्यक्रमासाठी
व्यासपीठावर आ.नितेश राणे, खासदार विनायक राऊत आणि सावंतवाडीचे सेना आमदार
दीपक केसरकरही होते. याच कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीवस आणि आताच
केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणेही सहभागी झाले, पण ऑनलाईन. एकमेकांना एकेरीवर
बोलणारे, प्रसंगी राडा करणारे, जाहीर शिव्याशाप देणारे, राणे, राऊत ही मंडळी एकाच
व्यासपीठावर पाहून राजकीय वर्तूळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पण राणे- राऊतांनी
जी फटकेबाजी केली, त्यामुळे तर राज्यात सेना-भाजप युतीची सुरुवात कोकणातूनच झालीय
की काय असा सवाल विचारला जातोय.

काय म्हणाले नितेश राणे?
ह्या कार्यक्रमात नितेश राणे एकदम मोकळं, थेट आणि खुलून बोलले. ते म्हणाले-
‘राज्यभरात यूतीची चर्चा होतेय. हल्ली यूतीची चर्चा बंद झाली होती. पण आजचं हे व्यासपीठ
बघितल्यानंतर युतीची आशा करणारे आमचे असंख्य चाहते सुखावले असतील. आणि रात्री
चांगले जोमाने झोपतील एवढच यावेळेस सांगतो. जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता
पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, जिथं जिथं आम्हाला सिंधूदुर्ग, कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या
विकासासाठी कोणाबरोबरही एकत्र येण्याची वेळ आली, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश
आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु’.

शिवसेना नेते विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?
नितेश राणेंचं भाषण झालं. ते व्यासपीठावर जाऊन बसले. शिवसेनेचे खासदार विनायक
राऊतांनी चक्क नितेश राणेंचा खांदा थोपटला. नंतर ते स्वत: भाषणाला उभे राहीले त्यावेळेस
म्हणाले,-आमदार आणि माझे मित्र नितेशजी राणे (राऊतांच्या ह्या वक्तव्यावर सभागृहात हसू)
नाही हसू नका आम्ही आहोत मित्र. आता त्यांचं भाषण झालं आणि आम्ही एकमेकांना काँग्रॅटस
केलं. नाही माणूस विचाराचा श्रीमंत असला पाहिजे’.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
नितेश राणे आणि विनायक राऊत यांचं तुझ्या गळा माझ्या गळा झाल्यानंतर नारायण राणेंनी
तर थेट आशीर्वादच देऊन टाकला. ते दिल्लातूनच कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले,
‘सर्वच लोकप्रतिनिधी सहभागी झाले. उदघाटन झाले. नांदा सौख्यभरे मी म्हणेन. जिल्ह्याच्या
विकासासाठी एकत्र या’.

शिवसेना आणि राणे कुटुंबियात असा एक दिवस जात नाही, ज्यादिवशी त्यांच्यात शाब्दिक
चकमक होत नसेल. विनायक राऊत आणि नितेश-निलेश राणे यांच्यात तर टीका करताना
भाषेची मर्यादाही रहात नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यात राजकीय कार्यक्रमात जो
एकमेकांना साखरेत घोळण्याचा प्रयत्न झाला त्यानं कोकणातलच नाही तर मुंबईतलही
राजकारण बदलू शकतं. हे बदललेलं वातावरण सेना-भाजपला युतीपर्यंत घेऊन जाणार
का हे पहाणं आता औत्सुक्याचं ठरेल. (narayan rane says he is happy with all the leaders

coming together vinayak raut and nitesh rane on same stage)