हॉटेलमध्ये एकत्र जेवले, बाहेर येताच मित्राने रचला भयंकर कट अन् मग पुढे जे घडलं…

खारघर येथे ५७ तोळे सोन्याची लूट करणाऱ्या ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, फिर्यादीच्या मित्रानेच हा कट रचल्याचे उघड झाले आहे.

हॉटेलमध्ये एकत्र जेवले, बाहेर येताच मित्राने रचला भयंकर कट अन् मग पुढे जे घडलं...
friends
| Updated on: May 11, 2026 | 1:14 PM

खारघर परिसरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून तब्बल ५७ तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खारघर पोलिसांना मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे, ज्या मित्रावर विश्वास टाकून फिर्यादी वावरत होता, त्याच मित्राने या संपूर्ण लुटीचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीला गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशांत नामदेव मोरे हे बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून आपल्या मित्रांसह कारने घरी परतत होते. ते खारघरमधील त्यांच्या घराजवळ पोहोचले असता, अचानक तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी सुशांत आणि त्यांच्या मित्रांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. यावेळी झालेल्या झटापटीत सुशांत यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी चालकाकडे असलेले ५७ तोळे सोन्याचे दागिने हिसकावत घटनास्थळावरून पळ केला.

धक्कादायक खुलासा

भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष तपास पथके तयार करण्यात आली. यानंतर तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई सुशांत यांचा मित्र अभिनंदन माळी याच्याकडे वळवली. यानंतर सखोल चौकशीदरम्याने माळी यानेच आपली पत्नी, मेहुणा आणि गावाकडील काही साथीदारांच्या मदतीने ही लूट घडवून आणल्याचे उघड झाले आहे.

पाच जिल्ह्यांत शोधमोहीम

या प्रकरणीतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर या भागात छापे टाकले होते. मात्र मुख्य आरोपी पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन लपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी मोठ्या हुशारीने त्यांना पंढरपूरमधून ताब्यात घेतले.

५७ तोळे सोन्याचे दागिने जप्त

पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले संपूर्ण ५७ तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेला चाकू, एक मारुती स्विफ्ट कार आणि एक रायडर मोटारसायकल जप्त केली आहे. सध्या पाच आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर सध्या दोन आरोपी पोलीस कोठडीत आहेत. खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक डमाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Follow Us