जनावराचे काळीज, कुंकू-गुलाल अन्… ऐन दिवाळीत कोल्हापुरातील रस्त्यावर अघोरी प्रकार, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावात दिवाळीत अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री जनावराचे काळीज ठेवून कुंकू-गुलाल वापरून हा विधी करण्यात आला.

जनावराचे काळीज, कुंकू-गुलाल अन्... ऐन दिवाळीत कोल्हापुरातील रस्त्यावर अघोरी प्रकार, नेमकं काय घडलं?
| Updated on: Oct 23, 2025 | 12:18 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत ऐन दिवाळीच्या काळात अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यारात्रीच्या सुमारास साधारण आठ ते दहा तरुणांनी गावात फिरून ही पूजा केल्याचे समोर आले आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही सध्या व्हायरल होत आहे. या घटनेमुळे इंगळी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंगळी गावाच्या मुख्य कमानीजवळ, थेट रस्त्याच्या मध्यभागी जनावराचे काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून त्याभोवती हा विधी करण्यात आला होता. या ‘पूजे’च्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुंकू, गुलाल, लिंबू, तसेच केळी आणि कापलेले केळीचे झाड ठेवण्यात आले होते. पहाटेच्या वेळी काही ग्रामस्थ रस्त्यावरून जात असताना त्यांना हा विचित्र प्रकार दिसला. जनावराचे काळीज, त्यावर टाकलेला कुंकू-गुलाल आणि इतर वस्तू पाहून हा केवळ गैरप्रकार नसून, अघोरी पूजा किंवा तंत्र-मंत्राचा भाग असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली.

नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण

हा प्रकार उघडकीस येताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ऐन दिवाळीसारख्या पवित्र सणाच्या काळात गावात अशाप्रकारची अघोरी कृत्ये घडल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळताच इंगळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळावरील साहित्य ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये काही तरुण मध्यरात्री गावात फिरताना आणि हा प्रकार करताना स्पष्ट दिसत होते. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून पाच संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

चोख बंदोबस्त तैनात

दरम्यान, अनेक ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा घटकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे. या अघोरी पूजेचा नेमका उद्देश काय होता आणि कोणत्या हेतूने हा प्रकार घडवून आणला गेला, याचा शोध घेतला जात आहे. इंगळी परिसरात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच खबरदारी म्हणून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.