
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक (Kolhapur North By Election) जाहीर करण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग येत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडण्यात आल्या. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव (Jayshri Jadhav) आणि सत्यजित कदम हे दोन उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभा असले तरी, प्रतिष्ठा पणाला लावली ती कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी. या पोटनिवडणुकीचा प्रचार चालू झाला आणि भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना खुले आव्हान देत काँग्रेसने 70 वर्षात काय केले हे सांगा म्हणत बिंदू चौकात येण्याचे आव्हान दिले. त्यानंतर कोल्हापुरातील राजकारणात खरी कुस्ती चालू झाली.
चंद्रकांतदादांनी दिलेले खुले आव्हान स्वीकारत सतेज पाटील यांनी मी बिंदू चौकात येण्यास तयार आहे, आणि मी 70 वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे, तुम्ही गेल्या सात वर्षात काय केले ते सांगा म्हणत बंटी पाटील यांनीही मग कोल्हापुरातील राजकारणात शड्डू ठोकला.
आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि कोल्हापुरची पोटनिवडणूक जाहीर झाली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार म्हणजेच महाविकास आघाडी असल्याने ज्यावेळी कोणत्याही पक्षाबाबत एखादी दुःखद घटना घडली तर त्या पक्षाचाच उमेदवार दिला जाईल असं वरिष्ठ पातळीवर ठरवण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. कोल्हापूर उत्तर मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदार संघातून माजी आमदार राजेश क्षीरसागर हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात राजेश क्षीरसागरांना उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः क्षीरसागर आणि कार्यकर्ते नाराजीचा सूर आळवत होते. त्यानंतर मात्र राजेश क्षीरसागर यांनी आमची मदत ही काँग्रेसच्याच उमेदवाराला केली जाईल असे त्यांनी जाहीर केले आणि त्याचाच परिणाम पोटनिवडणुकीच्या निकालात झाला.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील बहुचर्चित नाव म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील. कोल्हापूरच्या राजकारणातील कोणतच पान त्यांच्या नावाशिवाय हालत नाही. पोटनिवडणुकीआधी काही महिन्यापूर्वी गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महादेव महाडीक गट प्रबळ असला तरी त्या सगळ्यांना चॅलेंज बंटी पाटील यांनी केले आणि गोकुळच्या राजकारणचं कॅन आपल्या ताब्यात ठेवलं. गोकुळवर आपल्या गटाची सत्ता आणल्यानंतर साहजिकच बंटी पाटलांचा विश्वास आणखी दुणावला, आणि त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत याच विश्वासाने विरोधकांविरोधात शड्डू ठोकला आणि कोल्हापूरच्या मैदानातील ही राजकीय कुस्ती सहज मारुली.
कोल्हापूर पोटनिवडणूक यासाठी महत्वाची आहे की, आजच्या घडीला आजी माजी असे दोन्ही पालकमंत्री कोल्हापूरच्या राजकारणाच केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे सतेज पाटील असो किंवा चंद्रकांत पाटील असो या दोघांनाही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदार संघात शिवसेने आणि राष्ट्रवादीची मदत घेऊन बंटी पाटलांनी आपल्या उमेदवाराचा विजय खेचून आणला, आणि आपली प्रतिष्ठा जपत काँग्रेसचा झेंडा लहरत ठेवला आहे.
केंद्रात भाजपच्या सत्ता आल्यानंतर अनेक बड्या बड्या नेत्यांना ईडीची भीती घालण्यात आली. त्यातून शरद पवारसुद्धा सुटले नाहीत. शरद पवारांना नोटील दिल्यानंतर त्यांनीच ईडीच्या ऑफिसात येतो म्हणून निरोप पाठवला. त्यानंतर ईडीचे धाडसत्र सुरुच राहिलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत कुणाला ऑनलाईन पेमेंट येत असेल तर त्यांची ईडी चौकशी लावणार असे सांगितले. त्यानंतर त्या घटनेचीही जोरदार चर्चा कोल्हापुरात झाली.
सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूरच्या राजकारणावर आपला वरचष्मा कायमच ठेवला आहे. गोकुळची निवडणूक असो की, कोल्हापूर जिल्हा परिषद असो, किंवा केडीसीची निवडणूक असो या सगळ्यांमध्ये बंटी पाटील आपले टेक्निक वापरुन निवडणूक लढतात आणि जिंकतातसुद्धा असं चित्र कोल्हापूरच्या राजकारणात आहे. त्यामुळे आताही पोटनिवडणूक जाहीर होताच आणि काँग्रेसचा उमेदवार ठरताच बंटी पाटलांनी आपले टेक्निक वापरुन जयश्री जाधवांना निवडूनही आणले.
संबंधित बातम्या
मला तारीख आणि वेळ द्या, मी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसेचं पठन करणार – नवनीत राणा
धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज, प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती