Kolhapur Crime: आधी भरधाव गाडीने मुलीला चिरडलं, आता अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; कोल्हापुरातील तरुणाचं विकृत कृत्य
Kolhapur Crime News: कोल्हापुरात अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींच्या अंगावर भरधाव चारचाकी घालून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुलाने पुन्हा एक विकृत कृत्य केल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून राजवर्धन परीट याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला रूमवर भेटायला ये, अन्यथा ChatGPT च्या माध्यमातून तयार केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जुलै २०२५ मध्ये मुलींच्या अंगावर भरधाव चारचाकी घालून झालेल्या अपघात प्रकरणातही राजवर्धन परीटचे नाव समोर आले होते. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला होता.
राजवर्धन परीट हा २०२४ पासून महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याचा आरोप आहे. प्रेम व्यक्त करत तो वारंवार तिची गाडी अडवत असे. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असे. या त्रासाला कंटाळलेल्या मुलीला त्याने रूमवर भेटायला येण्यास सांगितले. तसेच भेटायला आली नाही तर ChatGPT च्या मदतीने तयार केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर राधानगरी पोलिसांनी राजवर्धन परीट याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जुलै २०२५ मध्ये राजवर्धन परीट याच्याशी संबंधित अपघाताची घटना घडली होती. मुलींच्या अंगावर भरधाव चारचाकी घातल्याने झालेल्या या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला होता.
त्या वेळी संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर प्रौढ आरोपीप्रमाणे कारवाई झाली नव्हती. मात्र, आता अल्पवयीन मुलीला त्रास देणे आणि अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीमुळे तो पुन्हा पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत आला आहे. एका अपघातात मुलीचा मृत्यू आणि त्यानंतर समोर आलेली विनयभंगाची तक्रार यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
