
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे राजकीय वादळ निर्माण झालं आहे. आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना गटाची खिल्ली उडवली आहे. या व्हिडीओवरून वाद सुरू असून भाजपने कुणाल कामराच्या चेहऱ्यावर काळं फासण्याचा इशारा दिला आहे. कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून वेगळं होण्यावर एक विडंबनात्मक गाणं बनवलं आहे. या गाण्यात त्याने शिंदेंचं थेट नाव घेतलं नाही, परंतु त्यांच्यासाठी त्याने ‘गद्दार’ हा शब्द वापरला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आणि त्याच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे. ज्या व्हिडीओवरून हा वाद सुरू झाला, तो कुणालने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
“जे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी केलंय ना, बोलावं लागेल. याठिकाणी त्यांनी आधी काय केलं? आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. मग एनसीपीतून एनसीपी बाहेर आली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. सर्वजण कन्फ्युज झाले. चालू एकाने केलं, ते मुंबईत खूप मोठा जिल्हा आहे.. ठाणे.. तिथले आहेत,” असं तो म्हणतो. यानंतर तो शाहरुख खानच्या ‘भोली सी सुरत.. आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर स्वत: बनवलेलं गाणं गाऊ लागतो. एकनाथ शिंदे यांच्यावर त्याने हे गाणं लिहिलंय.
“थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए
मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए
जिस थाली में खाए, उसमे ही वो छेद कर जाए
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी मे मिल जाए
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहें
विचार करा, हे यांचं राजकारण आहे. घराणेशाही संपवायची होती तर एखाद्याचा बाप यांनी चोरला. यावर काय रिप्लाय असेल? मी उद्या सचिन तेंडुलकरच्या मुलाला भेटून त्याला लंचला घेऊन जाऊन.. अर्धा तास तेंडुलकरचं कौतुक केल्यानंतर त्याला म्हणू, “हे बघ.. आजपासून तो माझा बाप आहे. तू ऑन द वे दुसरा शोधून घे”, असा विनोद तो करतो.