
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी सरकारने या योजनेसाठी पात्र नसलेल्या काही महिलांची नावं योजनेतून वगळी होती, तर काही महिलांनी स्वत: या योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान सरकारकडून आता योजनेला चाळणी लावण्यात आली आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नाव योजनेतून वगळण्यासाठी सरकारने या योजनेसाठी ई केवायसी ( Ladki Bahin Yojana E KYC) सक्तीची केली होती.
या ई केवायसीची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 होती, त्यानंतर योजनेची मुदत वाढवल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. मोठी बातमी म्हणजे आता ई- केवायसी वेळेत पूर्ण न केल्यामुळे राज्यातील तब्बल 67 लाख महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यांची नाव या योजनेच्या यादीमधून वगळण्यात आली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यातील 1 कोटी 80 लाख महिलांनीच या योजनेसाठीची केवायसी पूर्ण केली आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी केली त्यांचे पैसे नियमितपणे सुरू राहणार आहेत.
दरम्यान ज्या 67 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत, त्या केवळ त्यांनी केवायसी पूर्ण केली नाही म्हणूनच नाही, तर यातील काही महिला अशा आहेत, की त्या या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यातील अनेकांकडे वाहन असल्याचं समोर आलं आहे. तर काही ठिकाणी या महिला स्वत: सरकारी नोकरीला असल्याचं देखील आढळून आलं आहे. त्यामुळे आता अशा महिलांची नावं या यादीमधून वगळण्यात आली आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत या योजनेच्या केवायसी साठी आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत दिले होते, तसेच महिलांनी वेळेत केवायसी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं होतं.