Muhyamantri Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या भावां’चाही योजनेच्या पैशांवर डल्ला, 14 हजांराहून अधिक पुरुषांनी घेतला लाभ

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे. 14,000 जास्त पुरूषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटले आहेत. यामुले मोठी खळबळ माजली आहे. या पुरूषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लाटले, सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Muhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या भावांचाही योजनेच्या पैशांवर डल्ला, 14 हजांराहून अधिक पुरुषांनी घेतला लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा ?
Image Credit source: social media
| Updated on: Jul 26, 2025 | 8:39 AM

गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं, यासाठी तत्कालिन एकनाथ शिंदे सरकारने गेल्या वर्षी बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. तेव्हापासून लाभार्थी महिलाना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. मात्र इतर योजनांप्रमाणेच या योजनेचाही लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, तसेच गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव न सुटल्याने त्यांनी ला़की बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले होते. आता याच योजनेत आणखी एक गैरप्रकार झाल्याचेही समोर आले असून लाडक्या बहीणींसाठी सुरू केलेल्या या योजनेचाकाही लाडक्या भावांनाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 14 हजारांहून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्या पैशांचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरूषांनी 1500 रुपये लाटले असून वाटप करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा 21 कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची छाननी असून त्यातच हा गैरप्रकार झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.

14 हजारांपेक्षा अधिक लाडक्या भावांनी योजनेचा घेतला लाभ

गेल्या वर्षी जुलै महिन्यात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. योजनेचा पहिला लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख बहिणींना मिळाला होता, त्यानंतर ही संख्या कमी-जास्त होत गेली. या योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने योजनेतीला लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय घेतला. त्यातच हा प्रकार उघड झाला असून लाभार्थी महिलांच्या यादीत चक्क पुरूषांचीही नावे असल्याचे समोर आले. ही संख्या थोडीथोडकी नव्हे तर 14 हजार 298 असल्याचेही उघड झाले असून त्यापायी 21 कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले. मात्र या पुरूषांची नावं लाभार्थींच्या यादीत कशी गेली, ती कोणी घुसवली, महिलांसाठी असलेली योजना आणि त्याचे पैसे यावर पुरुषांनी नेमका डल्ला कसा मारला असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

पुरूष असूनही घेतली महिलांची नावं

हा गैरप्रकार इथेच थांबलेला नाही तर या यादीतील काही नावांबद्दलही संशय असून पुरूष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन योजनेचा लाभ घेत ते पैसे मिळवल्याचीही शंका आहे. याच नावांची छाननी करण्याचे काम सध्या सुरू असून 14 हजार 289 पुरूष ला़की बहीणच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे उघड झाल्यावर आता त्यांना मिळणारे 1500 रुपये बंद करण्यात आले आहेत. मात्र या पुरूषांनी सुमारे वर्षभर जे पैसे लाटले, सरकार ते आता परत घेणार का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सरकारी कर्मचारी महिलांनीही मारला होता डल्ला

यापूर्वीही लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी ही योजना असतानाही, अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले, अनेक तक्रारीदेखील आल्या. राज्यातील तब्बल 1 लाख 60 हजांरापेक्षा अधिक (महिला-पुरूष) कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते.

जुलैचे पैसे कधी मिळणार?

गेल्यावर्षी सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच, जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत हे पैसै मिळतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याचे समजते.