Mukhyamantri Ladki Bahin yojana : लाडक्या बहीणींच्या पैशांवर डल्ला, आता कर्मचाऱ्यांना सरकारी ‘पाहुणचार’; मोठा दट्टा बसणार, थेट होणार कारवाई !

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, अनेक सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असूनही लाभ घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, जमा केलेले पैसे वसूल केले जातील.

Mukhyamantri Ladki Bahin yojana : लाडक्या बहीणींच्या पैशांवर डल्ला, आता कर्मचाऱ्यांना सरकारी पाहुणचार; मोठा दट्टा बसणार, थेट होणार कारवाई !
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाईचा दट्ट्या
Updated on: Nov 21, 2025 | 9:33 AM

महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’  (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) नोव्हेंबरचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यात 1500 रुपये येतील. राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून सध्या त्यांची ईकेवायसी सुरू आहे. मात्र त्याच दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा अनेक सरकारी कर्मचारी, तसेच पुरूषांनीही गैरफायदा घेतला होता, अशी माहिती काही समोर आली होती. आता ईकेवायसी सुरू असतानाच यासंदर्भात आणखी अपडेट्स समोर आले आहेत. आत्तापर्यंत पाच हजार सरकारी कर्मचारी, तीन हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही या योजनेचा गैरफायदा घेतला आहे अशी धक्कादायक बाब उघड झाली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ज्या महिल्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जुलै 2024 मध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर राज्यभरातल्या अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी याचा लाभ घेतला. दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1500 अर्थात दीड हजार रुपये जमा होऊ लागले. या योजनेत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले होते.

सध्या या योजनेसाठी अर्ज केलेल्या ‘लाडक्या बहिणीं’ची ईकेवायसी सुरू आहे. तसेच लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये असली तरीही, त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेचे पैसे लाटले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, पैसे वसूल होणारच पण…

अनेक कर्मचाऱ्यांनी या पैशांवर डल्ला मारल्याचे उघड झाले असून ते कर्मचारी कोणत्या विभागातील आहे, ते महिन्याभरात स्पष्ट होईल. त्यानंतर त्या संबंधित विभागांना पत्र पाठवण्यात येणार आहे, तसेच लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे. एवढंच नव्हे तर या योजनेचे त्यांनी आत्तापर्यंत जेवढे पैसे लाटले आहेत, ती सर्व रक्कम वसूल केली जाणार असून त्यांची पगारवाढ रोखण्यासंदर्भातही पावले उटलून कारवाई केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. याविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार असल्याचे समजते.

कोणी कोणी घेतला गैरफायदा ?

मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत पाच हजार सरकारी कर्मचारी, तीन हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही या योजनेचा गैरफायदा घेतला आहे.अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेची रक्कम लाटली आणि दर महिन्याला 1500 रुपये पदरात पाडून घेतल्याचे उघड झाले आहे. त्या सर्वांवर आता मोठी कारवाई केली जाणार आहे.

ईकेवायसीची मुदत वाढवली

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर यापुढे संबंधित महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आधी त्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे आत्तापर्यंत लाखो महिलांचे ईकेवायसी अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून ही मुदत वाढवण्यात आली असून आता 31 डिसेंबर 2025 ई-केवायसी करता येणार आहे.