Ajit Pawar | चोरडियांच्या बंगल्यात शरद पवारांसोबत कशी झाली भेट? अजित पवार यांनी सगळ सत्य सांगितलं

Ajit Pawar | ही भेट नेमकी काय होती? भेटीचा घटनाक्रम काय होता? ते अजित पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? ते भाजपासोबत की, इंडियासोबत? असा प्रश्न सहकारी पक्षांच्या मनात निर्माण झाला आहे.

Ajit Pawar | चोरडियांच्या बंगल्यात शरद पवारांसोबत कशी झाली भेट? अजित पवार यांनी सगळ सत्य सांगितलं
Sharad pawar-Ajit pawar
| Edited By: | Updated on: Aug 15, 2023 | 12:31 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अतुल चोरडिया यांच्या घरी भेट झाली होती. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाली होती. अतुल चोरडिया एक व्यावसायिक आहेत. मागच्या आठवड्यात ही भेट झाल्याच समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या बैठकीमुळे शरद पवार यांच्याबद्दल इंडिया आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? ते भाजपासोबत की, इंडियासोबत? असा प्रश्न सहकारी पक्षांच्या मनात निर्माण झाला आहे.

आज कोल्हापूरात अजित पवार हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे सगळं सांगितलं.

‘पुण्याच्या बैठकीच मनावर घेऊ नका’

“पुण्याच्या बैठकीच मनावर घेऊ नका. शरद पवार हे पवार कुटुंबातील ज्येष्ठ वडिलधारी व्यक्ती आहेत. मी त्यांचा पुतण्या आहे. हे मीडियावाले अशा भेटीला प्रसिद्धी देतात. त्यातून समज-गैरसमज निर्माण होतात. फार तिथे काही वेगळं घडलं असं समजू नका” असं अजित पवार म्हणाले. “जनतेला सांगेन, यापुढे केव्हाही भेटलो तर त्यातून कुठलाही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते मी लपून गेलेलो नाही, मी उजळ माथ्याने फिरणारा आहे” असं अजित पवार म्हणाले.

‘मी त्या गाडीत नव्हतो’

त्यांनी पत्रकारांना उलटा सवाल केला. “तुम्ही मला लपून गेल्याच कुठे बघितलं?. मी उद्या तुमच्या घरी आलो, तर कधी निघायच हे मी ठरवणार. ज्या गाडीला अपघात झाला म्हणताय ती माझी नाही. मी त्या गाडीत नव्हतो” धडकलेल्या गाडीवरुन अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

चोरडियांशी दोन पिढ्यांपासून संबंध

“चोरडिया यांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत. चोरडियांचे वडिल पवारसाहेबांचे वर्गमित्र होते. माझा कार्यक्रम चांदनी चौकात होता. व्हीएसआयसाठी शरद पवार पुण्यात होते. त्याचवेळी चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलावलं. जयंत पाटीलही पवारसाहेबांसोबत होते. जर दोन पिढ्यांपासून ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींनी जेवायला बोलावलं, तर त्यातून वेगळा अर्थ काढू नये” असं अजित पवार म्हणाले.