
पुण्यातील खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी करत चक्क ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. या पार्टीतील काही व्हिडीओ देखील व्हायरल झाली. धक्कादायक म्हणजे या पार्टीत पुरूषांसोबतच काही महिला देखील उपस्थित होत्या. पुणे पोलिसांनी कोर्टात प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडीओ सापडल्याचे सांगण्यात आलंय. मुलीचा व्हिडीओ पाठवत असा माल हवा असल्याचे प्रांजल खेवलकरने दुसऱ्या आरोपीला म्हटले होते.
पतीला रेव्ह पार्टीमध्ये पकडल्यानंतर रोहिणी खडसे यांनी तब्बल 24 तास त्यावर भाष्य करणे टाळले. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्य लवकरच बाहेर येईल, असे म्हटले. त्यानंतर त्या थेट कोर्टात वकिली कोर्ट घालून हजर झाल्या. रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट देखील घेतली. यावेळी त्यांनी रेव्ह पार्टीबद्दल पवारांना माहिती दिल्याची माहिती कळतंय.
कोर्टाने प्रांजल खेवलकरला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. खेवलकरचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा असताना देखील अजून कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला नाहीये. खेवलकर हा सध्या येरवडा जेलमध्येच आहे. जावई जेलमध्ये असताना जामिनासाठी अर्ज खडसे कुटुंबियांकडून केला जात नसल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. मात्र, प्रांजल खेवलकरांवरील एफआयआर रद्द करण्यासाठी वकील हायकोर्टात जाणार असल्याने त्यांनी अजून जामिनासाठी अर्ज केला नाहीये. जामीन अर्ज करण्यापेक्षा हायकोर्टात जाऊन एफआयआर रद्द करणे महत्त्वाचे असल्याची सूत्रांची माहिती.
यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, जामिनासाठी अर्जच केलेला नाही. त्यामुळे जावायचा जामीन होऊ शकला नाही हा प्रश्न येऊ शकत नाही. हे सर्व न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर अधिक भाष्य सध्या न केलेलं बरं असेही ते म्हणाले. हे सर्व टॅप केलेला आहे मुद्दामून केलेलं षडयंत्र आहे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. रोहिणी खडसे यांच्यासाठी खास पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.