शिवरायांचे स्मारक राजभवनावर होऊ द्या, उद्धव ठाकरे यांचा उदयनराजे यांच्या मागणीला पाठींबा

नाशिक येथे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची तोफ आज धडाडली. यावेळी भाषणात त्यांनी भाजपा सरकारवर मोठी जोरदार टीका केली आहे.

शिवरायांचे स्मारक राजभवनावर होऊ द्या, उद्धव ठाकरे यांचा उदयनराजे यांच्या मागणीला पाठींबा
Uddhav Thackeray and udyanraje bhosale
| Updated on: Apr 16, 2025 | 6:46 PM

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजभवनाच्या जागेवर शिवरायांचे भव्य स्मारक होऊ द्या अशी मागणी केली होती. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना नाशिकच्या मेळाव्या उदयनराजे भोसले यांच्या मागणीला पाठींबा देत राज्यपालापेक्षा शिवरायांचे स्थान मोठे असल्याने राजभवनाच्या जागेवरच शिवरायाचे स्मारक व्हावे अशी मागणी भर सभेत केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभारण्याचा संकल्प आणि जलपूजन झाले होते. त्यावेळी भाजपा सोबत आपण होतो. अरबी समुद्रात नरेंद्र मोदी यांच्या सोबत समुद्रात बोटीने गेलो होतो. त्यानंतर दोन वर्षात देवेंद्र फडणवीस शिवरायाचे स्मारक उभारतील असे वाटले होते. परंतू एक विटही उभी केलेली नाही. त्यामुळे राजपालांना एखादा मंत्र्यांचा बंगला देऊन टाका. अनेक मंत्र्यांकडे दोन दोन बंगले आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यास आता मुंबईत कुठे जागा नाहीए, त्यामुळे राजभवनावरच हे स्मारक उभारणे उचित होईल असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले…

मी मागे एक मुद्दा मांडला होता. आता उदयनराजे भोसले बोलले. ते बरोबर बोलले. नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. मोदींना पट्टा बांधला. त्यांनी फुलं वाहिली. आम्हाला वाटलं फडणवीस बसले स्मारक दोन तीन वर्षात होईल. अरबी समुद्रात स्मारक होत नसेल तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यपालांना कुठे तरी शिफ्ट करा

उद्धव ठाकरे  पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाही. होऊच शकत नाही. राज्यपाल पद सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले आहे. आपल्यावेळी कोश्यारी कसे वागत होते पाहिलं आहे. काय तो थाट, कशाला पाहिजे. राज्यपाल पदाचा अवमान त्या खुर्चीवरची व्यक्तीच करत असेल तर काय करायचं ते पाहा. राज्यपालांना कुठे तरी शिफ्ट करा. राज्यपाल भवनाच्या जागी शिवस्मारक उभं करा. तसाही राज्यपालांचा जनतेशी संबंध असतो किंवा नसतो. मंत्र्यांकडे दोन दोन तीन तीन बंगले आहेत. द्या राज्यपालांना एक बंगला. मुंबईत जागा राहिली नाही. राज्यपाल भवनाची जागा आहे. स्मारक उभारा. आम्ही देतो पाठिंबा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.