Panjabrao Dakh weather update : नदी नाले एक होणार; पावसाची प्रतिक्षा संपणार, पंजाबराव डख यांचा नवा मान्सून अंदाज
राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे, मात्र अजूनही महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसानं हवा तसा जोर पकडलेला नाहीये. राज्यातील काही भाग तर असे आहेत, जिथे अद्याप पाऊसच झालेला नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. मान्सूनचा पाऊस झाला नसल्यानं पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. राज्यात मान्सूनची वाटचाल ही संथ गतीने सुरू आहे. येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज होता. परंतु मान्सूनची वाटचाल मंदावल्यानं येत्या 22 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तो पर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असा इशाराही भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा मान्सूनच्या वाटचालीबद्दलचा नवा अंदाज समोर आला आहे. राज्यात सध्या पावसाचं प्रमाण असमान दिसून येत आहे, काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पाऊस झालेला नाहीये. येत्या 13 तारखेपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल, परंतु तो विखुरलेल्या स्वरुपात असेल, म्हणजे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही, एक दिवस पडले दुसऱ्या दिवशी पडणार नाही, असं त्याचं स्वरुप असेल असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. येत्या 20 जून पर्यंत राज्यात अशीच स्थिती असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर मात्र दोन जोरदार पावसाची शक्यता आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पावसावर अल निनोचं सावट
दरम्यान यंदाच्या पावसावर अल् निनोचं सावट आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. सुरुवातीला हवामान विभागाकडून देशात सरासरी 92 टक्के इतका पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता सुधारीत अंदाजानुसार देशात यंदा पावसाचं प्रमाण सरासरीच्या केवळ 90 टक्के इतकचं राहण्याची शक्यात आहे. यंदा देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तयारीला सुरुवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.