
नाशिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. नाशित या मंदिरांच्या नगरीत हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु केला जाणार आहे. आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रशिक्षणासोबत आता वैदिक मंत्रांचे प्रशिक्षण देणे आता वादाचे केंद्र ठरले आहे. स्थानिक पुरोहितांनी यास विरोध केला आहे.
दर १२ वर्षांनी नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपूर्ण देशातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. प्रामुख्याने या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘नारायण नागबळी’, ‘कालसर्प पूजा’ तसेच इतर कर्मकांड पूजा करण्यात येतात.या भाविकांच्या पूजा विधीसाठी पुरोहितांची कमतरता होऊ शकते म्हणून सरकारतर्फे आता ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार आणि मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे कुंभमेळ्यात योग्य प्रशिक्षण घेतलेले पुजारी उपलब्ध होतील. दरम्यान या अभ्यासक्रमासंदर्भात त्र्यंबकेश्वर आयटीआयच्या प्राचार्यांनी माहिती दिली आहे.
नाशिक शहरातील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरातील स्थानिक पुरोहितांचा आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा रोजगार हिरावला जाईल या भीतीने याला विरोध होऊ लागला आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायाला वेदांचे शिक्षण आवश्यक असते. मात्र शॉर्ट कोर्सेस सुरू करून याचं व्यवसायात रुपांतर करण्याचा सरकारचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत पुरोहित संघाने व्यक्त केले आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून देखील याला विरोध केला जात आहेत.
शासनाच्या या निर्णयानंतर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शासनाने सर्वांचाच विचार केला पाहिजे जर आयटीआय मध्ये शिक्षण द्यायचे असेल तर पुरोहितांनाही बरोबर घेतले पाहिजे एकतर्फी निर्णय घेऊन चालणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये आधीच स्थानिक पुरोहित आणि परप्रांतीय यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद आहेत. अनेक वेळेस हाणामाऱ्या सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे शासनाचा हा रोजगाराभिमुख नवीन उपक्रम किती यशस्वी होणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
– सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन आयटीआयमध्ये हे शॉर्ट मुदतीचे अभ्यासक्रम सुरू होत आहेत
– अडीचशे तासांच्या या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे.
– इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
– प्रवेश प्रक्रियेत अर्जाची छाननी आणि मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
– सिंहस्थात पुरोहितांच्या उपलब्धतेसाठी कोर्स