सोलापुरात LOVE PAKISTAN, मुस्लिम बांधवांनी केला प्रकार उघड, नेमकं काय घडलं?
नमाजसाठी आलेल्या मुस्लिम बांधवानी 'त्या' फुगेवाल्याची अधिक चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी फुगे विक्री करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्याने 'ते' फुगे कुठून आणले याची चौकशी करत आहेत.

सोलापूर : आज आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर, पंढरपूरमध्ये भक्तीचा महासागर लोटला आहे. अवघा महाराष्ट्र आज विठ्ठलमय झाला आहे. तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांची ईद हा सणही आजच असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. दोन्ही उत्सव शांततेने पार पडत असताना सोलापूरमध्ये मात्र सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आलाय. ईदच्यादिवशी पाकिस्तान विषयी प्रेम दर्शवणारे फुगे विक्रीसाठी आणण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापुर येथील ईदगाह मैदानाजवळ एका फुगा विक्रेता फुगे विकत होता. मात्र त्याच्याजवळ काही आक्षेपार्ह फुगे असल्याचे बकरी ईद निमित्त नमाजसाठी आलेल्या मुस्लिम बांधवाच्या लक्षात आले. त्या मुस्लिम बांधवानी त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ पाकिस्तानचा झेंडा आणि LOVE PAKISTAN असे लिहलेले फुगे आढळून आले.
नमाजसाठी आलेल्या त्या मुस्लिम बांधवानी ‘त्या’ फुगेवाल्याची अधिक चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी फुगे विक्री करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्याने ‘ते’ फुगे कुठून आणले याची पोलीस चौकशी करत आहेत.
हे फुगे बाजारात कसे आले, कुणी तयार केले आणि ज्यांनी या फुग्यांची होलसेल विक्री केली त्या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएम वाहतुक आघाडीचे शहाराध्यक्ष रियाज सय्यद यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोलापूर पोलिसांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या मेळा पंढरपूरमध्ये जमला असून अत्यंत शिस्तबद्ध रीतीने वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठूमाऊलीचे दर्शन घेत आहेत.
नांदेडमध्ये आषाढी महोत्सव आणि ईदही साजरी
नांदेडच्या तरोडा खुर्द भागातील खाजगी शाळांनी प्रति पंढरपूर भरवत आषाढी महोत्सव साजरा केला. पंढरपूरच्या पायी दिंडीत होणारा रिंगण सोहळा विद्यार्थ्यानी नांदेडमध्ये भरवत विठू नामाचा गजर केला. तर, मुस्लिम बांधवानी बकरी ईद उत्साहात साजरी केली. ईद उल अझहा निमित देगलुर नाका येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. शहरातील मस्जिदीमध्ये सकाळी ईदची नमाज झाली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
