मोठी बातमी | कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात लम्पीनं 10 जनावरांचा मृत्यू, महाराष्ट्रात काय स्थिती?

| Updated on: Sep 14, 2022 | 11:28 AM

लम्पी स्किन आजाराचा महाराष्ट्रातील फैलाव वाढत आहे. आता तर थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातील एका गावात 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी | कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात लम्पीनं 10 जनावरांचा मृत्यू, महाराष्ट्रात काय स्थिती?
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: social media
Follow us on

औरंगाबादः महाराष्ट्रात लम्पी आजाराचा फैलाव झपाट्याने होतोय. आता तर थेट कृषीमंत्र्यांच्या मतदार संघातूनच धक्कादायक बातमी हाती आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील एका गावात तब्बल 10 जनावरं लम्पी आजारानं दगावली आहे. उंडणगावमधील ही घटना आहे. गावातील अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली असून त्यात 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांतील 396 गावांमध्ये लम्पीचा प्रसार झाला आहे.

औरंगाबादमध्ये आणखी कुठे लागण?

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या पाच तालुक्यांमध्ये लम्पी स्किन आजाराची लागण जनावरांमध्ये दिसून येत आहे. बऱ्याच जनावरांना तत्काळ उपचार देण्यात आले. त्यामुळे गायी-गुरं बरीही होत आहेत. मात्र सिल्लोडमधील उंडणगावात आज तब्बल 10 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कालपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात एकाही जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली नव्हती.

जनावरांचा बाजार बंद

दरम्यान लम्पी प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही जनावारांचा बाजार, जत्रा, प्रदर्शन तसेच जनावरांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा तातडीच्या सूचना काल दिल्या.

राज्यभरात पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे. प्रत्येक गावात मोफत लस देण्यात यावी, असे आदेशही राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत.

गुजरातमधून येणाऱ्या जनावरांना नो एंट्री

लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे. गुजरातसह उत्तरेकडून येणाऱ्या राज्यांतील जनावरांना महाराष्ट्रात येण्यास मनाई करण्यात आली आहे. . पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय़ घेतलाय. महाराष्ट्र सीमेवर तीन  नाके उभारून जनावरांची बारकाईने तपासणी करण्यात येणार आहे.

वाशिमध्ये काय स्थिती?

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद आणि खडकी सदार येथे लम्पी
आजाराची लागण झाली आहे. लम्पी प्रतिबंधासाठी 10 हजार लस प्राप्त झाल्या आहेत. जनावरे बाधित आढळून आलेल्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान रिसोड तालुक्यात एकूण 20 जनावरांना लम्पी आजार झाला आहे. त्यापैकी 12 जनावरे बरी झाली आहेत. 8 जनावरांवर उपचार सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.