
हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. “माझ उद्धवजींना एवढच सांगणं आहे की, मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकारांचा उपयोग केला, तर चांगलं होईल. राज्यात हिंदी सक्ती नाही, मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई हाय कोर्टाने काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या, आता तरी राहुल गांधी यांचे आरोप थांबतील असं वाटतं का? त्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
“मला असं वाटतं की, राहुल गांधी यांचा देशाच्या संविधानावर विश्वास असेल, लोकशाहीवर विश्वास असेल, आणि न्यायालयीन पद्धतीवर विश्वास असेल, तर आतातरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत. काल अतिशय विस्तृत निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याच काम करणाऱ्यांना पुराव्यासहीत, न्यायासहित, संविधानासहित माननीय उच्च न्यायालायने उत्तर दिलं आहे. काही लोक झोपेच सोंग घेऊन झोपल्यासारखं करतील, तर ये पब्लिक हैं, सब जानती हैं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बबनराव लोणीकरांच वक्तव्य चुकीच
बबनराव लोणीकरांच्या विधानासंदर्भात पत्रकारांनी विचारलं, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बबनराव लोणीकरांच विधान पूर्णपणे चुकीच आहे. काही लोकांना उद्देशून जरी त्यांनी असं विधान केलं असेल तरी असं विधान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान म्हणतात मी प्रधानसेवक आहे. आम्ही सर्व जनतेचे सेवेक आहोत, आम्हाला मालक बनता येणार नाही. बबनराव लोणीकरांच वक्तव्य चुकीच आहे, तशी त्यांना समज देण्यात येईल” असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले’
भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले आहेत, अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे. गावातील काही टिकाकरांवर बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “तुमच्या आई, बहीण आणि बायकोला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो. तुमच्या अंगावरचे कपडे आणि बुटं देखील आम्हीच दिलेले आहेत” अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे.